नव्वदीनंतरही आत्मविश्वास दांडगा; ७१ वृद्धांची कोरोनावर मात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:59+5:302021-06-10T04:10:59+5:30
नाशिक : पहिल्या लाटेत कोरोनाने सर्वाधिक घात हा ज्येष्ठ नागरिकांचाच केला होता. मात्र, त्या परिस्थितीतही कोरोनावर मात करणाऱ्या ज्येष्ठ ...
नाशिक : पहिल्या लाटेत कोरोनाने सर्वाधिक घात हा ज्येष्ठ नागरिकांचाच केला होता. मात्र, त्या परिस्थितीतही कोरोनावर मात करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये ९० वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या तब्बल ७१ वृद्धांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.
कोरोनाच्या प्रारंभापासून आतापर्यंत सर्वाधिक बळी गेलेल्या नागरिकांमध्ये साठ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाणच सर्वाधिक मोठे आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक असूनही ज्या नागरिकांनी त्यांचा व्यायाम, योग, आहार, दिनचर्या, फिरणे यात सातत्य राखले होते, अशा अनेक ज्येष्ठांनीदेखील कोरोनावर मात केली आहे. त्यातही नव्वदीच्या वर असणाऱ्या वृद्धांनी कोरोनावर मात करण्याची उदाहरणे पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत जवळपास समान आहेत. पहिल्या लाटेत सुमारे ३८ रुग्ण, तर दुसऱ्या लाटेत ३३ वयोवृद्ध कोरोना रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन कोरोनावर मात केली आहे. त्यात घरी राहून औषधोपचार करून बरे झालेल्या नव्वदीपार रुग्णांची तर नोंदच नसली तरी ती यापेक्षाही मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इन्फो
६० पेक्षा अधिक वयोगटात सर्वाधिक मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या ५ हजारांहून अधिक मृत्यूंपैकी सर्वाधिक सुमारे निम्मे बळी हे ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. आतापर्यंत या ज्येष्ठ नागरिक गटात २,४१७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५५ ते ६० वयोगटातील सुमारे हजाराहून अधिक बळींची नोंद आहे. म्हणजे ५५ वरील ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूची आकडेवारी एकूण बळींच्या तुलनेत सुमारे दोनतृतीयांश असल्याचे दिसून येत आहे.
कोट
आम्हाला कोरोना हरवू शकत नाही
अत्यंत कष्ट घेऊन शिक्षण आणि नोकरी केली आहे, तसेच निवृत्तीपश्चातही नियमित योगासने, फिरणे कायम ठेवले होते. त्यामुळे नव्वदीनंतरही कुणाचाही आधार कधी घ्यावा लागलेला नाही. त्यामुळे कोरोनावरही निश्चितपणे मात करू, असा आत्मविश्वास होता आणि तसेच झाले.
-बळीराम कोथमिरे, ज्येष्ठ नागरिक
नव्वदी पार केली असली तरी स्वत:ची सर्व कामे अद्यापही मीच करताे. त्यामुळे शरीर चांगले ॲक्टिव्ह आहे. बालपणापासून असलेली व्यायामाची आवड शरीर मजबूत ठेवण्यास कारणीभूत ठरली. त्यामुळेच कोरोनामुळे ॲडमिट व्हावे लागले तरी त्यावर मात करून पुन्हा नियमित योगासने सुरू केली आहेत.
-देवीदास शुक्ल, ज्येष्ठ नागरिक
----------------------------------------
ही डमी आहे. (७९२)