कळवणला जनजीवन विस्कळीत

By Admin | Published: July 11, 2016 11:34 PM2016-07-11T23:34:54+5:302016-07-11T23:49:40+5:30

अर्जुनसागर : लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूरमध्ये १५२ मिमी पाऊस

Confirming life-threatening disorder | कळवणला जनजीवन विस्कळीत

कळवणला जनजीवन विस्कळीत

googlenewsNext

 कळवण : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाली असून, शनिवारी व रविवारी दिवसभर कळवण शहर व तालुक्याच्या आदिवासीसह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या १२ तासात
कळवण शहरात १५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात २४० मिमी, तर चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात १५२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील जलप्रकल्पांच्या साठ्यात वाढ झाली आहे.
पावसामुळे कळवण शहरातील व तालुक्यातील जनजीवन दोन दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी
शिरले. शेतात तुडुंब पाणी भरल्याने अनेक बांध फुटले. त्यात शेतातील रोपे वाहून गेली. सप्तशृंगगडावर तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गडावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात घाटात दरड कोसळली होती; परंतु सप्तशृंगगडाचे उपसरपंच राजेश गवळी यांनी रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कळवण तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस झाला. चणकापूरसह अर्जुनसागर धरणाच्या व नांदुरी, गोबापूर, मार्कंड पिंप्री, मळगाव, खिराड, मुळाणे, जामले, भेगू, धनोली आदि लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार
आहे. कळवण, अभोणा, कनाशी, जयदर, सप्तशृंगगड, साकोरे, शिरसमणी, नवी बेज, ओतूर, नांदुरी, मोकभणगी, देसराणे, दळवट, खर्डे दिगर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दोन दिवसांपासून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
कळवण शहरातील विविध भागात व रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. कळवण शहरात सर्वत्र पाण्याचे तळे व डबके निर्माण झाले असून, गटारी तुडुंब भरल्या आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने कळवण शहर जलमय झाले आहे. तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने कळवण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील स्त्यांवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जाण्या-येण्याचा मार्गच बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. (वार्ताहर)

Web Title: Confirming life-threatening disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.