नाशिकच्या कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयावर जप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 07:02 PM2018-03-27T19:02:39+5:302018-03-27T19:02:39+5:30

मिळकत कराची थकबाकी : शहरातील ३९४ मालमत्तांवर जप्तीची कारवाई

 Confiscation at the Congress Building, Nashik's Public Library | नाशिकच्या कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयावर जप्ती

नाशिकच्या कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयावर जप्ती

Next
ठळक मुद्दे महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई २१ मालमत्ताधारकांनी थकबाकीचा भरणा केला तर ७४ मिळकतधारकांनी भागश: रक्कम भरत जप्तीच्या कारवाईतून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे

नाशिक - महापालिकेने वर्षानुवर्षांपासून मिळकत कर थकविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचा बडगा उगारला असून आतापर्यंत शहरातील ३९४ मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये, प्रामुख्याने महात्मा गांधी मार्गावरील कॉँग्रेस भवन, सार्वजनिक वाचनालयासह सिकॉफ, आयमा या उद्योजक संस्थांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. नोटीस बजावल्यापासून २१ दिवसात संबंधितांनी थकबाकीचा भरणा न केल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मालमत्तांची थेट विक्री केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.
महापालिकेने ३१ मार्चपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टीच्या थकबाकी वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले असून गेल्या काही दिवसांपासून मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. त्यासंबंधीच्या नोटीसा बजावल्या जात आहेत. महापालिकेने आतापर्यंत ३९४ मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. त्यातील २१ मालमत्ताधारकांनी थकबाकीचा भरणा केला तर ७४ मिळकतधारकांनी भागश: रक्कम भरत जप्तीच्या कारवाईतून मान सोडवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत महापालिकेने ८४ लाख ८९ हजार रुपये थकबाकी वसुल केली आहे. दरम्यान, महापालिकेने महात्मा गांधीमार्गावरील नाशिक जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या मालमत्तेवरही जप्तीची कारवाई केली आहे. जिल्हा कॉँग्रेस भवनकडे २६ लाख ६३ हजार रुपये घरपट्टी थकीत आहे. महापालिकेने यापूर्वीही कॉँग्रेस कमिटीला जप्तीची नोटीस बजावली होती. दोन वर्षापूर्वी कॉँग्रेस कमिटीने दहा लाख रुपयांचा भरणाही केला होता. आता महापालिकेने पुन्हा एकदा नोटीस बजावतानाच जप्तीची कारवाई केली असून २१ दिवसात थकबाकीचा भरणा न केल्यास कॉँग्रेस भवनचा लिलाव करत ते विक्रीला काढले जाणार आहे. याशिवाय, महापालिकेने सार्वजनिक वाचनालयावरही जप्तीची कारवाई केली आहे. सावानानेही मुदतीत रकमेचा भरणा न केल्यास नियमानुसार विक्री केली जाणार असल्याची माहिती उपआयुक्तांनी दिली. सावानाकडे ७ लाख ७८ हजार रुपये थकबाकी आहे. महापालिकेने सातपूर विभागातील सिकॉफचे कार्यालय (१ लाख ३ हजार), सिडको विभागातील आयमाचे कार्यालय (१४ लाख ७४ हजार), सिडको डाकघर (२४ हजार), पूर्व विभागातील जिल्हा सहकार भवन (१४ लाख १७ हजार), हॉटेल वूडलॅँड (३५ लाख १९ हजार), नाशिकरोड विभागात आयसीआयसीआय बॅँक (१४ लाख), पश्चिम विभागातील माथाडी कामगार मंडळ (२ लाख ७७ हजार), पंचवटी विभागातील सेवाकुंज ट्रस्टी (१५ लाख ३८ हजार) आदींनाही नोटीसा बजावत जप्तीची कारवाई केली आहे.

Web Title:  Confiscation at the Congress Building, Nashik's Public Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.