आत्महत्याप्रकरणी कारवाईत दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 01:29 AM2018-08-27T01:29:38+5:302018-08-27T01:30:13+5:30
पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात शासनाच्या अध्यादेशातील सूचनांनुसार अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरणे अपेक्षित असताना ज्यांनी कोठडीतील संशयिताच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावरील कारवाई टळल्याने या प्रकरणातील बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यात आल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे़
नाशिक : पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात शासनाच्या अध्यादेशातील सूचनांनुसार अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरणे अपेक्षित असताना ज्यांनी कोठडीतील संशयिताच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावरील कारवाई टळल्याने या प्रकरणातील बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यात आल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे़ सिन्नर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपासी अंमलदाराने आरोपी जाधव यास अटक केली़ यानंतर पोलीस लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत जाधव याने आत्महत्या केली़ विशेष म्हणजे पोलीस कोठडीतील आरोपीसाठी आवश्यक असलेला बंदोबस्तच तैनात नसल्याचे समजते़ आरोपींसाठी असलेल्या चार गार्डपैकी तीन गार्ड वरिष्ठांच्या आदेशानुसार इतरत्र बंदोबस्तासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे़ आरोपीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे आवश्यक असून, सिन्नर पोलीस ठाण्याची पोलीस कोठडी ही ठाणे अंमलदारापासून सुमारे ५० ते ६० फुटांच्या अंतरावर आहे़ त्यामुळे अधीक्षकांनी अटक आरोपीच्या सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे अपेक्षित होते़ मात्र, या कारवाईपासून वरिष्ठांना वाचविले जात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे़ पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल फौजदारी याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार शासनाने काढलेल्या अध्यादेशात अटक आरोपीच्या सुरक्षिततेबाबत काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत़ या अध्यादेशातील सूचना क्रमांक दोननुसार अटक आरोपीची सुरक्षा, आरोग्य व जीविताची जबाबदारी ही त्यास अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व त्या पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची राहील, असे स्पष्ट म्हटले आहे़