म्हाडाशी पंगा घेणे महापालिकेच्या अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 02:11 AM2022-03-22T02:11:20+5:302022-03-22T02:11:40+5:30
शहरातील एक एकरापेक्षा अधिक मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील ३० टक्के घरकुले किती, अकरा वर्षांत मंजूर केलेले अभिन्यास किती, याची गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून म्हाडाने मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकांवर बेतली आहे. सोमवारी (दि २१) विधिमंडळात या संदर्भात म्हाडा-महापालिकेचा विषय गाजल्याने कैलास जाधव यांच्यावर गंडांतर आले आहे. अर्थात, महापालिकेच्या माहितीनुसार, प्रशासनाने म्हाडाला सर्व माहिती पाठविली असून, त्यानुसार ४ हजार ३०० निर्माणाधीन असलेली घरे आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आली आहेत.
नाशिक : शहरातील एक एकरापेक्षा अधिक मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील ३० टक्के घरकुले किती, अकरा वर्षांत मंजूर केलेले अभिन्यास किती, याची गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून म्हाडाने मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकांवर बेतली आहे. सोमवारी (दि २१) विधिमंडळात या संदर्भात म्हाडा-महापालिकेचा विषय गाजल्याने कैलास जाधव यांच्यावर गंडांतर आले आहे. अर्थात, महापालिकेच्या माहितीनुसार, प्रशासनाने म्हाडाला सर्व माहिती पाठविली असून, त्यानुसार ४ हजार ३०० निर्माणाधीन असलेली घरे आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आली आहेत.
गेल्या नेाव्हेंबर महिन्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर महापालिकेकडून घरे न मिळाल्याने घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर, त्यांनी स्वत:च एक व्हिडीओ जारी करून प्रशासनाकडून महापालिका आयुक्तांकडून २०१३ पासून मंजूर अभिन्यास आणि म्हाडाला दिलेली घरे याबाबत माहिती दिली जात नसल्याचे सांगत, या प्रकरणी महापालिकेत चाैकशीसाठी पथक पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर, महापालिकेने आधी माहिती पाठविली. मग पुन्हा दुरुस्तीसह पाठविली आणि त्यानंतर चार हजार चौरस मीटर क्षेत्रावरील अभिन्यास किती मंजूर केले. याबाबत मात्र भिन्नता होती. त्यातही नगररचना विभागाने तात्पुरते मंजूर अभिन्यास आणि अंतिम मंजूर अभिन्यास अशी माहिती दिली, परंतु ती पाठविण्यासही विलंब झाला. नगररचना उपसंचालक हर्षल बावीस्कर यांनी ही माहिती दिली असली, तरी त्यानंतरही आयुक्तांनी त्यांना सविस्तर माहिती संकलित करण्यास सांगितले होते. नोव्हेंबर महिन्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्तांसमवेत बैठक घेतली मात्र, त्यानंतर कोरोनाकाळातील कामे प्राधान्य करताना विलंब झाला, असा आयुक्त कैलास जाधव यांचा दावा होता, मात्र त्यानंतरही माहिती वेळेवर पोहाेचवली गेली नाही आणि जी माहिती अलीकडेच पाठवण्यात आली ती देखील समाधानकारक नसल्याचे गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांनी विधान परिषदेत सांगितले. त्यामुळे एकतर महापालिकेकडे तत्पर माहिती नव्हती आणि नंतर ती वेळेत दिली गेली नाही. म्हाडाला हलक्यात घेणेच महापालिकेला महागात पडले आहे.
इन्फो..
३० अंतिम अभिन्यास
नाशिक महापालिकेने अंतिमत: दिलेल्या माहितीनुसार ५२ तात्पुरते तर ३० अंतिम अभिन्यास मंजूर करण्यात आले आहेत. तर ४ हजार ३०० घरे निर्माणाधीन आहेत. ही घरे म्हाडाला देण्यात येणार आहेत.
इन्फो...
मनपाची २० जानेवारीची माहिती
-एकूण इमारतींची संख्या ३४
- म्हाडाच्या ताब्यात दिलेल्या इमारती १ (सदनिका ३६)
- म्हाडाने ना हरकत दिलेल्या इमारती २ (सदनिका ५६)
- म्हाडाकडे एनओसीसाठी दिलेले अर्ज २ (सदनिका १९७)
--
प्रशासकांचे काय होणार
महापालिकेचे माजी आयुक्त आणि विद्यमान प्रशासक कैलास जाधव दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून असून नगररचना विभागाचे उपसंचालक हर्षल बावीस्कर आणि कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल यांनीही मुंबईत जाऊन म्हाडा कार्यालय आणि विधी मंडळासाठी माहिती पुरवली. मात्र, प्रशासकांची बदली करण्याचे आदेशच विधान परिषद अध्यक्षांनी दिल्याने ते राहणार की जाणार, याची सोमवारी (दि.२१) नाशिक शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.