जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांबाबत संभ्रम
By admin | Published: July 5, 2017 11:29 PM2017-07-05T23:29:34+5:302017-07-05T23:29:55+5:30
आकडेवारीवर संशय : शासनाकडून दिशाभुलीची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गटसचिवांचा बहिष्कार व जिल्हा बॅँकेकडे असलेली कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्णातील कर्जदार शेतकऱ्यांची जाहीर केलेल्या आकडेवारीबाबत कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्येच संभ्रम निर्माण झाला असून, शेतकऱ्यांनीदेखील सदरची आकडेवारी फसवी असल्याची तक्रार केली जात आहे.
राज्यातील ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर नाशिक जिल्ह्णातील शेतकऱ्यांना संशय आहे. जिल्ह्णातील एक लाख ३६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले असले तरी, जिल्हा बॅँकेच्या कारभाऱ्यांनाही या आकडेवारीवर विश्वास नाही. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा नेमका लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत संभ्रम असून, सन २०१७ पर्यंत कर्जदार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी व्हावी, अशी मागणी राजकीय पातळीवर होऊ लागल्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत बदल होऊ शकतो, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार २८ जूनपासून विविध कार्यकारी सोसायटीचे गटसचिव बेमुदत संपावर गेलेले असून, कर्जदार शेतकऱ्यांची माहिती त्यांच्याशिवाय अन्य कोणाकडे नाही. अशा परिस्थितीत शासनाकडे कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जाणे शक्यच नाही.
आकडेवारीचा खेळ
शासनाला सादर केलेल्या माहितीबाबत संभ्रमशासनाच्या निकषाप्रमाणे ३० जून २०१६ पर्यंत दीड लाखापर्यंत जिल्हा बॅँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे. तर याच बॅँकेने शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीला सादर केलेल्या माहितीनुसार दीड लाख रुपयांपर्यंत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ५० हजार इतकी दाखविली आहे. अशा परिस्थितीत सरकारला सादर केलेली माहिती नेमकी कोणी सादर केली याचा उलगडा कोणीच करू शकलेला नाही.