दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:34+5:302021-04-09T04:14:34+5:30
जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : माध्यमिक परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल ते १५ मे दरम्यान बारावीची परीक्षा ...
जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : माध्यमिक परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल ते १५ मे दरम्यान बारावीची परीक्षा व २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची ऑफलाइन पध्दतीने लेखी परीक्षा होणार की पुढे ढकलली जाणार याबाबत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोना संसर्गाची स्थिती राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत शासनाने ३० एप्रिलपर्यंत मिनी लाॅकडाऊन लावून कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय झालेला आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, पुढे ढकलण्यात येणार, ऑनलाइन होणार की, ऑफलाइन. अन्यथा रद्द होणार याबाबत सोशल मीडियावर तर्क-वितर्क व अनेक अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याचा अभ्यासावर विपरित परिणाम होत आहे.
------------------
परीक्षा ऑफलाइन घेण्याची मागणी
महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये व खेड्या-पाड्यात संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबर राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे केली आहे. (०८ मालेगाव १/२)
---------------------
गेले वर्षभर प्रत्यक्ष काॅलेजला न येता, घरूनच ऑनलाइन पध्दतीने शिक्षण मिळत असल्याने, लिखाणाचा फारसा सराव झाला नव्हता. त्यामुळे लेखनाची गती कमी झाली होती. मात्र बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार असल्याने व परीक्षा आपल्याच महाविद्यालयात होणार असल्याने आनंद झाला होता. परीक्षेचा अभ्यास जोमाने सुरू होता. मात्र पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्याने, दिलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा होणार की, रद्द होणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे मन विचलित झाल्याने, अभ्यासात फारसे लक्ष लागत नाही.
कोमल कोरे, विद्यार्थिनी जळगाव निंबायती. (०८ कोमल कोरे)