गंगापूरमधून पाणी देण्याबाबत संभ्रम
By Admin | Published: December 2, 2015 10:45 PM2015-12-02T22:45:56+5:302015-12-02T22:46:36+5:30
प्रशासन अनभिज्ञ : पाटबंधारे खात्याकडून मागविली माहिती
नाशिक : गंगापूर व दारणा या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेला जनक्षोभ रोखण्यासाठी गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यातून नाशिक व निफाडच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या पालकमंत्री तथा जलसंपदामंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत खुद्द प्रशासनातच संभ्रम व्यक्त केला जात आहे. धरणातील पाण्यावर असलेले आरक्षण व प्रत्यक्ष साठा याचा कोणताही ताळमेळ बसत नसताना सिंचनासाठी तीन आवर्तने कसे सोडणार, अशी विचारणा प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे केली आहे.
२१ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्ह्यातील पाणी आरक्षण बैठकीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करून पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरल्यानंतर पाणी आरक्षणाचे फेरविचार करण्याचे ठरविण्यात आले व त्यानंतर दोन दिवसांनी मुंबईत झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांनी गंगापूर धरण समूहातून डाव्या तट कालव्यातून तीन आवर्तने द्राक्षबागांसाठी सोडण्याचे जाहीर केले, त्याच्या मोबदल्यात नाशिककरांसाठी दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला दिले होते. प्रत्यक्षात गंगापूर धरण समूहात ४१४१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, महापालिका, एकलहरे, औद्योगिक वसाहत, मेरीसह पाणीपुरवठा योजनांसाठी ४९४६ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे. म्हणजेच शिल्लक पाण्यापेक्षा मागणीच अधिक असून, त्यात पाटबंधारे खात्याने कपात सुचविलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून नाशिक महापालिकेला मागणीपेक्षाही कमी पाणी देण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात कपात करावी लागली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या घोषणेची पूर्तता कशी होणार, असा प्रश्न प्रशासनातील अधिकारी विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन आठवडे उलटून गेले असून, मुंबईत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अखेर पाटबंधारे खात्यालाच प्रशासनाने पत्र पाठवून धरणातील पाण्याची परिस्थिती व सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतची माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)