एकाच विमानतळाला तीन नावांमुळे प्रवाशांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 08:06 PM2020-12-16T20:06:50+5:302020-12-17T00:46:39+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील नाशिकपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जानोरी गावातील नाशिक एअरपोर्टला एकाऐवजी तीन नावांनी ओळखले जाते, त्यामुळे या विमानतळाचे खरे नाव काय याबाबत प्रवाशी तसेच जानोरी व ओझरच्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. तथापि, या गावाने जमिनी दिल्यामुळे सदर विमानतळाचे नामकरण ह्यजानोरी नाशिक एअरपोर्टह्ण असे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सन २०१३ ते २०१४ साली छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांच्या प्रयत्नाने एचएएल हद्दीत जानोरीलगत विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या विमानतळाच्या इमारतीवर नाशिक एअरपोर्ट असा उल्लेख आहे. ओझरचे ग्रामस्थ या विमानतळाला ओझर विमानतळ या नावाने तर जानोरीचे ग्रामस्थ जानोरी विमानतळ अशा नावाने ओळखतात. त्यामुळे प्रवाशी तसेच ओझर आणि जानोरी ग्रामस्थांमध्ये या तीन नावांबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. या विमानतळाला जानोरी ग्रामस्थांच्या जमिनी गेलेल्या आहेत. जानोरी हद्दीतच विमानतळाची एंट्री ठेवण्यात आली आहे. विमानतळाला लागणाऱ्या मोठ्या रस्त्याची अडचण येऊ लागली, तेव्हा जानोरीच्या शेतकऱ्यांनी सरकारी मोबदल्यात शेतीचे काही क्षेत्र दिले. एवढेच नव्हे; तर जानोरी ग्रामपंचायतीनेही वेळोवेळी मदत करून विमानतळासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली. ग्रामस्थांनी वेळोवेळी मदत करूनही सदर विमानतळाचे नाव जानोरी विमानतळ असे न दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे नऊ ते दहा हजार असून, गावात अनेक तरुण बेरोजगार आहेत. आपल्या गावात विमानतळ होत असल्याने आपल्याला कोणते ना कोणते काम मिळेल, अशी येथील अनेक तरुणांना अपेक्षा होती. परंतु, तसे काहीही न घडल्याने तरुणांचा अपेक्षाभंग झाला आहे.
बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळाच्या दोन ते तीन नावांमुळे दिशाभूल होत आहे. काही प्रवाशी अनेक ठिकाणच्या फलकावरील ओझर विमानतळ असे नाव वाचल्यामुळे नाशिक एअरपोर्टला येण्याऐवजी ओझरला निघून जातात. तेथून पुन्हा जानोरीला येतात. तेथील ग्रामस्थांना विमानतळाचा पत्ता विचारतात. त्यामुळे शासनाने सदर विमानतळाला जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नाव द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.