शिष्यवृत्ती परीक्षेविषयी विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:49+5:302021-04-26T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता आणखी पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २३ मे २०२१ रोजी होणार आहे; परंतु राज्य शिक्षण मंडळाने व सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही, याविषयी संभ्रम निर्माण झाला असून, कोरोनाचे संकट कमी झालेले नसताना या परीक्षेविषयी अद्यापही निश्चित निर्णय झालेला नसल्याने पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करण्यासोबतच शुल्क भरण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपुष्टात आली असली तरी परीक्षा होणार किंवा नाही याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेला बसणारे विद्यार्थी हे दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षाही लहान असल्याने या परीक्षेविषयी सरकार काय निर्णय घेणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा यंदा २५ एप्रिलला एकाच वेळी घेतली जाणार होती; परंतु या नियोजनात बदल करण्यात आला असून, आता २३ मे रोजी ही परीक्षा होणार आहे.