बाजार समिती निवडणुकीत मतदारांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 01:26 AM2021-11-13T01:26:36+5:302021-11-13T01:27:02+5:30
कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे.
कळवण : कोरोना महामारीच्या कालावधीत अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. तेथे राज्य सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नुकत्याच जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीत कोण मतदान करणार हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सहकार प्राधिकरणने त्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख व कळवण बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, बेबीलाल पालवी यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात नामदार भुसे व सहकार प्राधिकरण निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची मागणी केली असून सध्या सहकार प्राधिकरणाकडून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील चाळीस टक्के ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमलेले आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे कोणते सदस्य निवडणुकीत मतदान करू शकतील व कसे, याचा निवडणूक आदेशात स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
मागील निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत गटातील मतदार संख्या प्रशासक मुळे कमी झाली आहे हे मतदार याद्यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांचा मतदान हक्क हिरवला गेल्याने खळबळ उडाली आहे.
इन्फो
निवडणुकीला स्थगितीची मागणी
गेल्या सहा महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना निवडणुकीत मतदार समजण्यात यावे. तसे शासकीय नियमात नसेल तर तूर्तास कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडणुकांना स्थगिती देण्यात यावी. निवडणुका होईपर्यंत बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात यावेत. अन्यथा बाजार समित्यांच्या निवडणुकीवर त्याचा निश्चितच परिणाम होईल. अनेक ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय होऊन ते आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील. त्यामुळे या निवडणुकींना स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.