लसीच्या नवीन नियमांमुळे केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:20+5:302021-05-16T04:14:20+5:30
सातपूरला फक्त ४५ डोस एरवी लस घेण्यासाठी केंद्रावर प्रचंड गर्दी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य कर्मचाऱ्यांना नवीन आदेशामुळे प्रतिक्षा करावी ...
सातपूरला फक्त ४५ डोस
एरवी लस घेण्यासाठी केंद्रावर प्रचंड गर्दी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य कर्मचाऱ्यांना नवीन आदेशामुळे प्रतिक्षा करावी लागली. परिणामी काही तासात संपणारी लस शनिवारी संपलीच नाही.
सातपूर विभागातील संजीवनगर आणि गंगापूर या दोनच केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र या दोन्ही लस केंद्रावर तुरळक नागरिक येत होते. संजीवनगर केंद्रावर दिवसभरात अवघ्या ४५ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
सिडकोत गोंधळ
सिडकोतील लसीकरण केंद्रावर शनिवारी ४५ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. मात्र दुसरा घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना ८४ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगितल्याने लसीकरण केंद्रावर सकाळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
इंदिरानगरला ज्येष्ठ माघारी
भारतनगर व वडाळागाव लसीकरण केंद्रावर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागले. गेल्या काही दिवसांपासून या केंद्रांवर नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होत होती. परंतु आता नियम बदलल्याने व त्यातच शनिवारी लस उपलब्ध न झाल्याने हे दोन्ही केंद्र बंद ठेवण्यात आले.
नाशिकरोडला गोंधळ शमला
लसीकरण केंद्रांवर केंद्र शासनाच्या नवीन नियम व धोरणानुसार शनिवारी लस देण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी व गोंधळ नियंत्रणात आला आहे. शासनाच्या नवीन नियमामुळे पहिला अथवा दुसरा डोस देण्यात आलेल्या नागरिक अथवा महिला पहिला किंवा दुसरा डोस घेण्यास आल्यावर नवीन नियमाप्रमाणे त्यांची नावे रजिस्टर होत नसल्याने त्यांना लस देता येणार नाही असे कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. लस घेताना नाव नोंदणी होत नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून लस केंद्रातून निघून जाण्यातच धन्यता मानली. दरम्यान, पंचवटीतील लसीकरण केंद्रावर नवीन नियमानुसार ४५ वर्षावरील नागरिकांनाच पहिला डोस देण्यात आला. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी झाली होती.