शंका-शक्यतांची राळ उडाली !
By किरण अग्रवाल | Published: August 26, 2018 01:50 AM2018-08-26T01:50:40+5:302018-08-26T01:57:10+5:30
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या हिरे यांची भेट घेणे हे राजकारणातील तिरक्या चालीचेच लक्षण ठरावे. येऊ घातलेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी त्यास लाभल्याने शंका-कुशंकांची व शिवसेनेतील फेरमांडणीच्या शक्यतांची राळ उडून जाणे स्वाभाविक आहे. निकराच्या होऊ घातलेल्या लढतीसाठी सक्षमतेचा निकष तर त्यामागे असावाच; परंतु विद्यमानांची त्यासंदर्भातील विकलांगताही त्यातून अधोरेखित व्हावी. प्रत्यक्ष रणांगणात उतरण्यापूर्वीचे हे फटाके संभाव्य राजकीय प्रदूषणाची चाहूल देणारेच म्हणायला हवेत.
तत्त्व व निष्ठा गुंडाळून केल्या जाणाऱ्या अलीकडच्या राजकारणात कमालीची अनिश्चितता वाढीस लागली आहे, त्यामुळे कसल्याही व कोणाही बाबतीत खात्रीने काहीच सांगता येऊ नये. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यात शंका-कुशंकांची पडत असलेली भर पाहता, संभ्रमाची पुटे गहिरी झाल्याखेरीज राहत नाहीत. राजकारणातल्या सरळ चालीऐवजी तिरक्या चालींना महत्त्व आले आहे ते त्यामुळेच, कारण दिल्ली निघायचे सांगून मुंबई गाठण्याचे प्रकार त्यातून घडून येताना दिसतात. यातून साध्य काय होते हा वेगळा विषय; परंतु काही संकेत नक्कीच प्रसृत होतात जे आगामी काळातील शक्यतांची चर्चा घडविण्यास पुरेसे ठरून जातात. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अलीकडील आपल्या नाशिक दौºयात हिरे कुटुंबीयांची घेतलेली भेट अशीच काही शक्यतांना जन्म देऊन गेली आहे.
आगामी निवडणुकांचे पडघम वाजायला लागले असून, सत्ताधारी व विरोधकांमध्ये ज्या पद्धतीने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत ते पाहता यंदाची लढाई निकराने लढली जाण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात सत्ताधाºयांतील शिवसेनेने अगोदरच स्वबळाचा नारा दिला असल्याने भाजपाही कंबर कसून कामाला लागली आहे. अर्थात, विरोधकांची एकजूट व तिला लाभू पाहणारा प्रतिसाद पाहता ‘स्व-बळा’चा हेका अखेरपर्यंत टिकून राहीलच याचीही शाश्वती देता येऊ नये. परंतु उभयतांनी आपापल्या पद्धतीने चाचपणी सुरू केली आहे हे मात्र खरे. याचाच एक भाग म्हणून की काय, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडील त्यांच्या नाशिक दौºयात जिल्ह्यातील मातब्बर अशा हिरे कुटुंबीयांची भेट घेतली. मूळ काँग्रेसी असलेल्या या कुटुंबातील प्रशांतदादा हिरे मध्यंतरी शिवसेनेत गेले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मालेगावी एका जंगी सभेत त्यांचा प्रवेशसोहळा झाला होता. त्यामुळे या पक्षाचे किंवा त्याच्या नेत्यांबद्दल त्यांना वावडे असायचे काही कारण नाही, परिणामी राऊत यांची भेट खासगीही म्हटली जाऊ शकते; परंतु ती एका वेगळ्या पार्श्वभूमीवर झाल्याने त्याबद्दल चर्चा घडून येणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.
एकतर, लोकसभेत नाशिकचे प्रतिनिधित्व करणारे हेमंत गोडसे हे दिवसभर राऊत यांच्यासमवेत राहिले असताना नेमके हिरे यांच्याकडे जाताना त्यांना टाळले गेले. गोडसे हे पुन्हा लोकसभेसाठी उत्सुक आहे. नाशिकमधून खासदार ‘रिपीट’ होत नसल्याची गेल्या सुमारे तीन दशकांपासूनची परंपरा खंडित करून दाखवण्याची त्यांची इच्छा असताना हे घडले. यातील शक्यतेचा मुद्दा असा की, अपूर्व हिरे स्वत: लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही आरंभिली आहे. विधिमंडळात शिक्षक आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना त्यांनी भाजपाला समर्थन दिले होते; परंतु सध्या ते राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होऊ घातला आहे; पण तारखा मिळत नसल्याने विलंब होत आहे. त्यातून उद्भवलेल्या अस्वस्थतेचा शिवसेना लाभ घेऊ पाहणार असेल तर दुसरे म्हणजे, गोडसे शिवसेनेकडून जसे उमेदवारी इच्छुक आहेत, तसे ते दुसरेही पर्याय चाचपडत असण्याची चर्चा उघडपणे होत आहे. शिवसेना व भाजपातील ‘खडाखडी’ जगजाहीर असताना आणि तितकेच नव्हे तर याच पार्श्वभूमीवर गेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीचे इच्छुक शिवाजी सहाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्याने त्यांची उमेदवारी बाद झाल्याचे उदाहरण समोर असताना गोडसेदेखील मुख्यमंत्री व पंतप्रधानांना भेटून आल्याची चर्चा त्यासंदर्भाने होत आहे. खासदार म्हणून काही मागण्यांनिमित्त कदाचित या भेटी झाल्या असतीलही; परंतु त्यामागील वास्तविक ‘मागणी’ची चर्चा मात्र वेगळीच होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राऊत व हिरे यांची भेट झाली आहे, म्हणून ती राजकीय परिघावर शंका-कुशंकांचे मोहोळ उठवून गेली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, गेल्यावेळी गोडसे हे ‘मनसे’तून शिवसेनेत येऊन लढले होते. त्यामुळे नाही म्हटले तरी ‘मनसे’बद्दलची नकारात्मकता त्यांच्या कामी आली होती. शिवाय, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेची ‘युती’ होती. त्यात मोदी महिमा मोठ्या प्रमाणात मतदारांवर गारुड करणारा ठरला होता. त्यामुळेच छगन भुजबळ यांच्यासारख्या बाहुबली नेत्यास पराभूत करून लोकसभा गाठणे गोडसे यांना शक्य झाले होते. सध्या मात्र चित्र बदलताना दिसत आहे. ‘युती’ होण्याची लक्षणे नाही. सर्व विरोधकांची महाआघाडी साकारून एकच तुल्यबळ उमेदवार समोर राहण्याची शक्यता आहे. अशात नाशिक लोकसभा मतदारसंघातील निकालाची, म्हणजे खासदार ‘रिपीट’ न होण्याच्या परंपरेची चिंता, शिवाय गोडसे यांनी ती परंपरा खंडित करण्यायोग्य खूप काही भरीव, भव्य-दिव्य कामे करून दाखविलीत म्हणावे तर तसेही नाही. निवेदने वाटण्याखेरीज फारशी कामे त्यांच्या नावावर नाहीत, की त्यांनी साकारलेल्या कामांच्या कोनशिला. त्यामुळे शिवसेनेला खरेच स्वबळावर लढायचे झाले तर गोडसे सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाऊ शकतील का, हा खुद्द त्यांच्याच पक्षातील प्रश्न आहे.
याला आणखी एक पदर आहे तो म्हणजे, पक्षांतर्गत गटबाजीचा. शिवसेनेतील पदाधिकारी बदलानंतरही ती थांबलेली नाही. युवानेते आदित्य ठाकरे यांनी काल-परवाच दोन दिवसांचा जिल्हा दौरा केला. तो राजकीय नव्हता. आरोग्य शिबिर व महिला स्व-संरक्षण शिबिरासारख्या कार्यक्रमानिमित्त तो होता. त्यात बोलताना ठाकरे यांनी, राज्यातील जनतेचे भगव्यावर व शिवसेनेवर प्रेम असल्याचे सांगितले. ते प्रेम किती व कसे हे वेळोवेळीच्या निवडणुकांत दिसूनही आले आहे. शिवसैनिकांची शक्ती या पक्षाकडे आहेदेखील; पण जनतेचे पक्षावर प्रेम असणे वेगळे व पक्षातील काही नेत्या-कार्यकर्त्यांना खुद्द पक्षाच्या खासदाराबद्दलच प्रेम नसणे वेगळे; तेव्हा
गोडसेंना टाळून राऊत यांनी हिरे यांची भेट घेण्यामागे असे अनेक संदर्भ आहेत, ज्यांची तर्कसंगत मांडणी करता काही शक्यता प्रसवणे अप्रस्तृत ठरू नये. बरे, या शक्यता माध्यमांमधून जाहीरपणे चर्चिल्या जात असताना कुणाकडून कसला इन्कारदेखील केला गेलेला नाही. त्यामुळे शक्यतांचा पाळणा झुलता राहणे स्वाभाविक आहे.