नांदूरवैद्य उपकेंद्रावर बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:15+5:302021-07-07T04:18:15+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नांदूरवैद्य येथील आरोग्य उपकेंद्रात १८ वर्षांवरील नागरिकांना तसेच पहिला डोस ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नांदूरवैद्य येथील आरोग्य उपकेंद्रात १८ वर्षांवरील नागरिकांना तसेच पहिला डोस घेऊन ८४ दिवस संपून दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येणार असल्याचे चार ते पाच दिवसांपूर्वी सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथील आरोग्य उपकेंद्राच्या समोर सकाळी ७ वाजेपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु या गर्दीमध्ये बाहेरील नागरिकच जास्त असल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी गावातील नागरिकांनाच प्रथम प्राधान्य देण्यात यावे या अटीवर ठाम राहत आरोग्य उपकेंद्रासमोर एकच गोंधळ उडाला. यामुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना समजावत शांत केले. नांदूरवैद्य येथे लसीकरणासाठी आलेल्या गर्दीमुळे आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांच्यावर ताण निर्माण झाल्यामुळे बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.घनश्याम बांबळे यांनी उपकेंद्रावर दाखल होत उपलब्ध लसींबाबत माहिती देत नियोजन करत लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी आरोग्यसेवक हितेश घरटे तसेच आशासेविका छाया काजळे, आशा काजळे यांनी सुरुवातीस नागरिकांना मास्क लावून रांगेत शांततेत उभे राहण्याची विनंती केली. परंतु यावेळी नागरिकांची संख्याच इतकी होती की, लसीची संख्या २१०, तर नागरिकांची संख्या पाचशे ते सहाशेपेक्षा जास्त असल्यामुळे यामध्ये अनेकांनी तोंडाला मास्क न लावताच रांगेत उभे राहणे, ठरावीक अंतर न ठेवता जवळच उभे राहणे यामुळे या आरोग्य उपकेंद्रावर फज्जा उडाला होता.
याप्रसंगी आरोग्यसेवक हितेश घरटे, आशासेविका राधिका दिवटे, छाया काजळे, आशा काजळे, विठोबा दिवटे, मोहन करंजकर, लक्ष्मण मुसळे, कैलास कर्पे, ज्ञानेश्वर काजळे, रवि काजळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------
नांदूरवैद्य येथील आरोग्य उपकेंद्रासमोर लसीकरणासाठी नागरिकांनी केलेली गर्दी. (०६ नांदूरवैद्य कोरोना)
060721\06nsk_26_06072021_13.jpg
०६ नांदुरवैद्य कोरोना