पावसाळ्यातील नमुन्यांमुळे गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:59 AM2019-08-24T00:59:42+5:302019-08-24T01:00:23+5:30
शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.
नाशिक : शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर नद्या प्रवाही असताना नमुने घेतल्याने त्यात प्रदूषणकारी घटक आढळले नाहीत. गोदावरी नदीसह संबंधित नद्या प्रदूषणमुक्त आहेत, असा प्रशासनाचा दावा नसून असलेले प्रदूषण दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व महापालिकांना वार्षिक पर्यावरण अहवाल तयार करणे बंधनकारक असते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत शहराच्या विविध भागात जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाचे मापन करून हा अहवाल पुढील वर्षी जुलै महिन्याच्या आत मंजूर करणे बंधनकारक आहे त्यानुसार यंदा अहवाल मांडण्यात आला. त्यात गोदावरी, नासर्डी, वालदेवी आणि कपिला या नद्यांचे पाणी नमुने तपासून अंतिमत: नदीपात्रातील पाणी शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय नाशिक शहरातील हवा उत्तम आहे. केवळ ध्वनिप्रदूषण अधिक आहे, असादेखील निष्कर्ष काढण्यात आला आहे. तथापि, गोदावरी नदीचे प्रदूषण हा सध्या पर्यावरणप्रेमींच्या दृष्टीने आस्थेचा विषय आहे. गेल्या काही वर्षांपासून यातील काही पर्यावरणप्रेमी कायदेशीर लढत आहेत, तर काहीजण जनप्रबोधन आणि अन्य सकारात्मक उपक्रम राबवित आहेत. असे असताना अचानक महापालिकेने काढलेल्या निष्कर्षामुळे खळबळ उडाली. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित असून, ही समिती निरीने नदी प्रदूषणमुक्तीसाठी दिलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असे असताना महापालिकेच्या अहवालामुळे संभ्रम निर्माण झाला होता. तर काही पर्यावरणप्रेमींनी नदीचे पाणी प्रक्रियेशिवाय इतके शुध्द असेल तर आयुक्तांसह पर्यावरण अधिकाऱ्यांनी जलप्राशन करून दाखवावे, असे आव्हान दिले.
दरम्यान, यासंदर्भात मनपाचे पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी यांनी नद्या प्रदूषित नाही, असे मनपाने म्हटलेले नाही. मनपाने पावसाळ्यानंतर पाण्याचे नमुने घेतले. त्या दरम्यान नदी प्रवाही असल्याने वेगळा निष्कर्ष काढला, असे सांगितले. गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी मनपाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.
गोदावरी नदीसह संबंधित नद्या प्रदूषणमुक्त आहेत, असा प्रशासनाचा दावा नसून असलेले प्रदूषण दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
महापालिकेने पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याचे नमुने घेतल्यानंतर ते प्रदूषित आले नाहीत यावरून बराच गोंधळ झाला. आता प्रशासन अहवाल वर्षात तीन वेळा पाण्याचे नमुने घेऊन निष्कर्ष काढणार आहेत. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तसे आदेश दिले असल्याची माहिती पर्यावरण अधिकारी वंजारी यांनी दिली.