आरोग्य सेवक परीक्षेदरम्यान गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:17 AM2021-03-01T04:17:07+5:302021-03-01T04:17:07+5:30
नाशिक : आरेाग्य सेवक या पदाकरिता रविवारी शहरातील काही केंद्रांवर कोरोना सुरक्षिततेच्या कारणावरून उमेदवारांनी गोंधळ घातला तर, एका ...
नाशिक : आरेाग्य सेवक या पदाकरिता रविवारी शहरातील काही केंद्रांवर कोरोना सुरक्षिततेच्या कारणावरून उमेदवारांनी गोंधळ घातला तर, एका ठिकाणी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. गंगापूर रोडवरील एका परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात उमेदवार पोहोचल्याने एक तास उशिराने परीक्षा सुरू झाल्याचेही उमेदवारांचे म्हणणे आहे.
नाशिक विभागातील २१ संवर्गातील ४७० पदासाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. शहरातील ४९ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या आरेाग्य सेवक पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यंदा परीक्षेचे नियोजन महिनाभरापूर्वीच करण्यात आल्याने रविवारी नियोजित तारखेला परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात यासाठी सुमारे ५२ हजार परीक्षार्थी प्रविष्ट झाले असले तरी, यापैकी केवळ २४ हजार उमेदवारच उपस्थित राहिले. तरीही अनेक केंद्रावर नियोजनाचा बोजवारा उडाला.
सिडकोतील ग्रामोदय विद्यालय केंद्रावरील एका कक्षात परीक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे पाकीट आणल्यानंतर सदर पाकिटाचे सील आगोरच उघडण्यात आले असल्याची बाब उमेदवारांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यातील काही उमेदवारांनी त्यास आक्षेप घेतला. मात्र संबंधित परीक्षकांनी कोणतीही दाद दिली नाही. संबंधितांनी आरोग्यमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याही कानावर हा प्रकार घातला. मात्र प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याने अखेेर संभ्रमाच्या वातावरणातच परीक्षा द्यावी लागली.
गंगापूर रोडवरील सीएमसी कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर कोरोना सुरक्षिततेची कोणतीही सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू होता. मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन मशीन अशी कोणतीही सुविधा नसल्याची तक्रार झाल्यानंतर यंत्रणेची धावपळ झाली. त्यानंतर साहित्य पुरविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांचा तासभर वेळ वाया गेला. परीक्षा कक्षात एकाच बेंचवर दोन विद्यार्थी बसविण्याच्या प्रकाराने पुन्हा गोंधळ उडाला. मात्र बहुसंची प्रश्नपत्रिका असल्याचे सांगून तेथील परीक्षकांनी वेळ मारून नेली. परीक्षेतील पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
--इन्फो--
हॉल तिकिटांचाही गोंधळ
काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटाला आक्षेप घेण्यात आला. ऑनलाईन हॉल तिकिटावरील माहिती चुकीची असल्याचा आक्षेप घेण्यात आला. तर काही ठिकाणी छायाचित्रावरूनदेखील परीक्षक, केंद्र प्रमुख आणि परीक्षार्थींमध्ये वाद झाला. जिल्हा आरोग्य प्रशासनाने मात्र शहरात केवळ गर्दी झाल्यामुळे यंत्रणा अपुरी पडल्याचे सांगितले. गैरप्रकार झाल्याचा इन्कार केला.
===Photopath===
280221\28nsk_20_28022021_13.jpg
===Caption===
गंगापूरोडवरील परीक्षा केंद्राबाहेर झालेली गर्दी