वाटाघाटी उपसमितीसमोरच गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:57 AM2017-07-21T00:57:28+5:302017-07-21T00:57:47+5:30
एसटी वेतनप्रश्न : आरोप-प्रत्यारोप, घोषणाबाजीने तणाव; तत्काळ पोलीस बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कामगार करारासाठी स्थापन करण्यात आलेल्या वाटाघाटी समितीने नाशिकमध्ये कामगारांची भूमिका जाणून घेण्याचा गुरुवारी प्रयत्न केला असता त्यांच्या समोरच कामगारांनी प्रचंड गोंधळ घालत घोषणाबाजी केल्याने अवघ्या सात ते आठ मिनिटांतच समितीला काढता पाय घ्यावा लागला. या प्रकारामध्ये दोन संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सदर प्रकारानंतर विभागीय कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा वेतन करार संपुष्टात येऊन सोळा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्यापही कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मिटलेला नाही. अधिकृत एस.टी. कामगार संघटनेने सातव्या वेतन आयोगाची मागणी केली आहे, तर उर्वरित १३ संघटनांनी कामगार करार करण्यात यावा, अशी भूमिका घेतलेली आहे. एस.टी. प्रशासनानेदेखील कराराची तयारी दर्शविली आहे. मात्र कामगार संघटना आयोगाच्या मुद्द्यावर ठाम आहे.
या पार्श्वभूमीवर एस.टी. प्रशासनाने नवीन कामगार करार करण्यासाठी आणि कामगारांची भूमिका ऐकून घेण्यासाठी वाटाघाटी समिती स्थापन केली आहे. या समितीचे मुख्य कामगार अधिकारी टी. एस. ढगे, महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक अधिकारी मिलिंद बंड, गायधनी, पराडकर, रत्नपारखी यांच्या प्रमुख उपस्थितीत एन. डी. पटेल रोडवरील डेपोत समितीने बैठक आयोजित केली होती. मात्र या समितीसमोरच मोठा गोंधळ झाल्याने समितीला कामकाज आटोपते घ्यावे लागले.
मुख्य कामगार अधिकारी ढगे यांनी प्रशासन करार करण्याच्या बाजूने असल्याचे सांगून अद्याप सातव्या वेतन आयोगाचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. राज्यात कुणालाही अद्याप आयोग लागू झालेला नाही. त्यामुळे त्याबाबतचा मसुदा तयार करण्यास किती वेळ लागेल हे सांगणे कठीण असल्याने करार करण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे सांगितले. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका मांडावी, असे आवाहन केले.
त्यानंतर एस.टी. कामगार सेनेचे सुभाष जाधव हे आपली बाजू मांडत असतानाच एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पवार यांनी आक्षेप घेत जाधव हे एका कामगार सेनेचे पदाधिकारी असून, या बैठकीत ते बोलू शकत नसल्याचा दावा केला. त्यानंतर कुणी बोलावे या मुद्द्यावरून वाद झाल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. समितीच्या व्यासपीठासमोरच कामगारांचा घोळका घोषणाबाजी करू लागल्याने समितीला तेथून काढता पाय घ्यावा लागला आणि अवघ्या सात-आठ मिनिटांतच समितीने कामकाज गुंडाळले. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांकडून आरोप- प्रत्यारोप करण्यात आले. दरम्यान, या गोंधळाबाबत कामगार संघटनेने इतर संघटनांवर खापर फोडले तर अन्य संघटनांनी कामगार संघटनेवर सभा उधळल्याचा आरोप केल्याने सभेनंतर प्र्रवेशद्वारावरही घोषणाबाजी सुरू होती.
संघटनेचा पूर्वनियोजित कट
राज्य परिवहन प्रशासनाने एसटी कामगार संघटना करार करण्यात विलंब करीत असल्याचे कर्मचाऱ्यांसमोरच सांगितल्याने संघटनेचा खरा चेहरा समोर आला आहे. प्रशासन कराराच्या बाजूने असल्याने संघटनेला ही बाजू कर्मचाऱ्यांसमोर येऊ द्यायची नव्हती म्हणून त्यांनी गोंधळ घातला. समितीची सभा उधळून लावण्याचा कामगार संघटनेचा हा पूर्वनियोजित कट होता.
- सुभाष जाधव, एस.टी. कामगार सेना, राज्य संघटक सचिवघोषणाबाजी सेनेकडूनच
प्रशासनाची उपसमिती कामगारांची मते जाणून घेण्यासाठी नाशिकमध्ये आली होती. समिती केवळ कामगारांची मते जाणून घेणार होती. परंतु एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. ही बाब आम्ही समितीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आम्ही फक्त वस्तुस्थिती समितीला सांगितली.
- विजय पवार, अध्यक्ष, एस.टी. कामगार संघटना