शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:07+5:302021-03-06T04:15:07+5:30
नाशिक : जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण स्थगित करण्याचा निर्णय काही तासांतच मागे घेण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. शिक्षक ...
नाशिक : जिल्ह्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण स्थगित करण्याचा निर्णय काही तासांतच मागे घेण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या स्वाक्षरीचे पत्र शुक्रवारी (दि. ५) दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पुन्हा शिक्षण उपसंचालक कार्यालयाला सर्वेक्षण पूर्ववत सुरू ठेण्याच्या आदेशाचे पत्र काढावे लागल्याने शिक्षण विभागातील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून, नाशिकमध्येही अकरावीसह पाचवी ते नववीचे वर्ग पुन्हा बंद करण्यात आल्यानंतर आता शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीमही थांबवावी, अशी मागणी शिक्षकांच्या संघटनांनी केली होती. यातील एका संघटनेने मागणीचा प्रस्ताव दिल्यानंतर तत्काळ स्थगिती मिळाल्याची घोषणाही सोशल मीडियावर करून टाकली. परंतु, अन्य संघटनांनी लेखी आदेशाविषयी विचारणा केली, तसेच अद्याप अशी अधिकृत घोषणा नसल्याचेही स्पष्ट केले. त्यावर शुक्रवारी (दि. ५) दुपारच्या सुमारास शिक्षण उपसंचालकांच्या स्वाक्षरीसह सर्वेक्षण स्थगितीच्या आदेशाचे पत्र व्हायरल झाले. यावर काही शिक्षकांनी सर्वेक्षणाचे बहुतांश काम झाल्यानंतर हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका केली. याविषयी वेगवेगळे मत उमटत असतानाच सायंकाळच्या सुमारास पुन्हा शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी सर्वेक्षण मोहीम पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणातील गोंधळ आणि असमन्वयाची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली.
इन्फो
लिपिकाची वेतनवाढ रोखली
शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणास स्थगिती दिल्याचे आदेश एका लिपिकाच्या चुकीमुळे व्हायरल झाल्याचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात अशाप्रकारे स्थगिती देण्याचा कोणताही विचार नव्हता. मात्र, लिपिकाच्या चुकीने असे पत्र बाहेर गेले. त्यामुळे तत्काळ ही प्रक्रिया पूर्ववत सुरू राहणार असल्यासंबंधी पत्र काढण्यात आले आहे. संबंधित लिपिकावर कारवाई करण्यात आली असून, त्याची वेतनवाढही रोखण्यात आल्याचे नितीन उपासनी यांनी सांगितले.