इगतपुरीत होम क्वॉरन्टाइन कुटुंब गायब झाल्याने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:40 AM2020-03-21T00:40:56+5:302020-03-21T00:41:53+5:30
आॅस्ट्रेलियातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आलेल्या एकाच कुटुंबीयातील चौघांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून चौघेही अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाचीदेखील धावपळ उडाली. मात्र, पोलिसांच्या मदतीने नाशिकमधून संबंधितांना शुक्रवारी (दि.२०) ताब्यात घेण्यात आले.
नाशिक : आॅस्ट्रेलियातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आलेल्या एकाच कुटुंबीयातील चौघांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निगराणीखाली ठेवण्यात आले होते. मात्र, तेथून चौघेही अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाचीदेखील धावपळ उडाली. मात्र, पोलिसांच्या मदतीने नाशिकमधून संबंधितांना शुक्रवारी (दि.२०) ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, संंबंधितांना कोणत्याही आजाराची लागण झाली नव्हती. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
इगतपुरी तालुक्यातील एका गावातील मूळ रहिवासी असलेले कुटुंबीय वर्षभर आॅस्ट्रेलियाला होते. तेथून ते ११ मार्च रोजी भारतात आणि त्यानंतर नाशिकमध्ये परतले. ११ ते १७ मार्च दरम्यान ते नाशिक शहरातच वास्तव्याला होते. त्यानंतर ते त्यांच्या मूळगावी परतल्यानंतर ही बाब इगतपुरी येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कळाल्यानंतर १८ मार्च रोजी आरोग्य पथक त्यांच्या घरी गेले आणि त्यांना आरोग्य विभागाने निगराणीखाली ठेवले होते. त्यांना घराच्या बाहेर न जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतरही संबंधितांचे एक घर नाशिक शहरात असल्याने आणि ते तेथे जात येत असल्याने पथकाला निगराणीत अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला.
त्यानुसार शीघ्र कृती दलाचे पथक रुग्णवाहिका घेऊन त्या ठिकाणी गेले असता संबंधित नाशिकला निघून आले आणि मोबाइलदेखील बंद केल्याचे आढळले. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. आरोग्य विभागाने त्यानुसार नाशिकमधील घोटी आणि अंबड पोलिसांना कळविले. त्यांनी धावपळ करून संबंधिताला त्याच्या फ्लॅटमधून ताब्यात घेतले आणि पुन्हा निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
पत्र व्हायरल
झालेच कसे?
संबंधित कुटुंबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी नाशिक आरोग्य विभागाला पत्र पाठवून कळविले होत, मात्र सदरचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज्यातील संशयित रुग्णांची नावे जाहीर करू नये, असे आरोग्य विभागाचे आदेश असताना सदर पत्र बाहेर गेलेच कसे याबाबत आता शोध सुरू झाला आहे. याबाबत चौकशी चालू असून, पत्र व्हायरल करणाºया विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले.
..तर कारवाई होणार
घरातच आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असूनदेखील संंबंधित नागरिक घराबाहेर दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. अशाप्रकारचे नागरिक अन्य नागरिकांमध्ये मिसळत असल्यास हेल्पलाइन क्रमांक १०४ व १०० या क्रमांकावर तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन मांढरे यांनी केले आहे.