सटाण्यात कोविड रुग्णालय सुरु झाल्याच्या अफवेने गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:47+5:302021-05-15T04:14:47+5:30
बागलाण तालुक्यात कोरोनाने थैमान घातल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डांगसौंदाणे व नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली. ...
बागलाण तालुक्यात कोरोनाने थैमान घातल्यानंतर जिल्हा प्रशासनाने डांगसौंदाणे व नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली. दरम्यानच्या काळात नामपूर रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे डांगसौंदाणे कोविड रुग्णालयावर मोठा ताण पडत होता. आमदार दिलीप बोरसे यांनी दखल घेतल्याने गेल्या आठवड्यात ऑक्सिजन पुरवठा करून रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे. चार दिवसांपासून लॉकडाऊनचे कडक नियम केल्याने दोन्ही रुग्णालयातील गंभीर रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. अशी परिस्थिती असताना शुक्रवारपासून शहरातील ट्रामा केअर युनिटमध्ये चाळीस ऑक्सिजन बेडचे कोविड रुग्णालय सुरू झाल्याची अफवा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही लेखी मान्यता दिली नसल्याचे सांगून ट्रामा केअर युनिट फक्त बिगर कोरोना रुग्णांसाठी खुले राहील, असे स्पष्ट केले. दरम्यान, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी कोरोना रुग्णालय सुरू झाल्याची अफवा पसरवून काय साध्य करत आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे . हा विषय संवेदनशील असून कोणीही जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन केले.