कसबे सुकेणे लसीकरण केंद्रावर टोकनवरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 PM2021-05-13T16:19:16+5:302021-05-13T16:20:09+5:30
कसबे सुकेणे : शहरातील काशी माळी समाज मंगल कार्यालयावरील कोविड लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यावरून नागरिकांत गोंधळ उडाला. दरम्यान एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने हा गोंधळ उडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर एका व्यक्तीस केवळ दोन टोकन देण्याचे नियोजन झाले.
कसबे सुकेणे : शहरातील काशी माळी समाज मंगल कार्यालयावरील कोविड लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यावरून नागरिकांत गोंधळ उडाला. दरम्यान एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने हा गोंधळ उडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर एका व्यक्तीस केवळ दोन टोकन देण्याचे नियोजन झाले.
कसबे सुकेणे गावाची लोकसंख्या गृहीत धरून कसबे सुकणे प्राथमिक आरोग्य केंद्राने आता शहरातील कोकणगाव रस्त्यावरील काशी माळी मंगल कार्यालयात दुसरे लसीकरण केंद्र सुरू केले आहे. गुरुवारी पहाटेपासूनच या केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी टोकन देताना एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याने उपस्थित नागरिकांनी आक्षेप घेतला. दरम्यान दत्ता पाटील, मौजे सुकेणेचे उपसरपंच सचिन मोगल, अरुण मोगल , आनंदराव भंडारे , बाबूराव जाधव , दीपक भंडारे ,सचिन पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांच्याशी चर्चा करून टोकन वितरण पद्धतीत बदल करण्याची मागणी केली. त्यानुसार नवीन बदल होऊन एका व्यक्तीस आता दोन टोकन दिले जाणार आहेत.
आता असे मिळणार टोकन
कसबे सुकेणे केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने लसीकरण सुरू असून लसीकरणाच्या दिवशी सकाळी सात वाजता केंद्रावर रांगेप्रमाणे टोकन दिले जाणार आहे. एका व्यक्तीला स्वतःचे एक व त्याच्या कुटुंबातील एकाला असे दोन टोकन मिळणार असून टोकन घेताना आता आधार कार्ड सक्तीचे झाले आहे. गावातील सोशल मीडियावर तशी पोस्ट व्हायरल झाली आहे, वैद्यकीय सूत्रांनी त्यास दुजोरा दिला आहे.
कसबे सुकेणे केंद्रावर एका व्यक्तीस अधिक टोकन दिल्याकारणाने सकाळी गोंधळ झाला. सर्वांना समान लाभ मिळाला पाहिजे. टोकन देताना वशिलेबाजी होऊ नये, ही प्रशासनाला विंनती.
-दत्ता पाटील, कसबे सुकेणे.