साहित्य संमेलन स्थगितीबाबत संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:07+5:302021-03-07T04:14:07+5:30
नाशिक महानगरात गत आठवडाभरात सातत्याने चारशे ते पाचशे रुग्ण बाधित आढळत आहेत. त्यात संमेलनाचे स्वागताध्यक्षदेखील दोन आठवड्यापूर्वीच कोरोना बाधित ...
नाशिक महानगरात गत आठवडाभरात सातत्याने चारशे ते पाचशे रुग्ण बाधित आढळत आहेत. त्यात संमेलनाचे स्वागताध्यक्षदेखील दोन आठवड्यापूर्वीच कोरोना बाधित झाल्यापासूनच संमेलनावर कोरोनाचे सावट जाणवू लागले होते; मात्र आठवड्याच्या प्रारंभापासून रुग्णसंख्या वाढू लागल्याने ते सावट अधिकच गहिरे होऊ लागले आहे. त्यात प्रस्तावित बालकुमार संमेलन तसेच प्रकाशकांचे पुण्यातील संमेलनदेखील पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच काही मान्यवर साहित्यिकांनीदेखील नाशिकच्या साहित्य संमेलनाला येण्यास असमर्थता कळवली असल्याचे समजते, तसेच बहुतांश मान्यवर साहित्यिक हे ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील असल्याने संमेलनासारख्या गर्दीच्या ठिकाणी कितीही दक्षता बाळगली तरी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही परिस्थिती आठवडाभरापासून कायम असून साहित्य संमेलनाला आता तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी उरलेला असल्याने त्याबाबतचा निर्णय साहित्य महामंडळ आणि आयोजक लोकहितवादी मंडळाने त्वरित घेणे आवश्यक असल्याचा सूर साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील हे संमेलन होणारच, अशा भूमिकेत तर निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर हे संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे, अशाच पवित्र्यात आहेत. तर संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले हे त्याबाबत तुम्ही निमंत्रकांशीच बाेला, असे सांगत असल्याने संभ्रमाची अवस्था कायम आहे.
इन्फो
स्वागताध्यक्षांची भूमिका निर्णायक
साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ हे दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाबाधित झाले होते. येत्या एक-दोन दिवसात ते क्वारंटाईनमधून बाहेर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यातून बाहेर आल्यानंतर संमेलनाबाबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच शासनातील वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून ते काय निर्णय घेतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.