हिंदुत्ववादी संघटनांचा आयुक्तालयात गोंधळ
By Admin | Published: December 9, 2015 11:07 PM2015-12-09T23:07:20+5:302015-12-09T23:07:51+5:30
नोंदणी विवाहाचे निमित्त : युवतीला पळवून नेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : नोंदणी पद्धतीने विवाहाची नोटीस दिलेल्या तरुणाने मित्रांसह युवतीच्या घरी जाऊन तिची आई व भावास मारहाण करून युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व युवतीला पळवून नेणाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयात गोंधळ घातला. सुमारे तीन तासांनंतर स्वत: पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून एका नोंदणी पद्धतीने विवाह संदर्भातील नोटीस संबंधितांच्या नाव, पत्ता व छायाचित्रानिशी व्हायरल झाली आहे. या नोटिसीप्रमाणे विवाहेच्छुक युवतीला ‘वाचवा’ म्हणूनही सोशल मीडियावर आवाहन करण्यात येत असल्याने त्याचा आधार घेत, विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी त्या युवतीच्या कुटुंबाचा शोघ घेतला. तत्पूर्वीच सदर युवतीस तरुणाने मित्रांच्या मदतीने घरातून पळवून नेल्याचे व जाताना युवतीची आई व भावाला मारहाण केल्याची माहिती युवतीच्या आईने हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यानुसार मंगळवारी सकाळी काही कार्यकर्त्यांनी युवतीची आई व भावास सोबत घेऊन इंदिरानगर पोलीस ठाण्यात संंबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी धाव घेतली. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
दरम्यान, इंदिरानगर पोलीस या साऱ्या प्रकरणात चालढकल करीत असल्याचा आरोप करीत, हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी सकाळी युवतीची आई व भावासह पोलीस आयुक्तालय गाठून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. युवतीशी चुकीच्या पद्धतीने नोंदणी विवाह करणे, तिच्या आई व भावास मारहाण करणे व इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देणे या साऱ्या गोेष्टींची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यावर प्रारंभी पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत कारवाईचे आश्वासन दिले़ मात्र संघटनेच्या नेत्यांनी यामध्ये पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालावे व पोलीस निरीक्षक सावंत यांच्यावर कारवाई करावी, या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त एन. अंबिका, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्यासोबत भाजपा उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, विश्व हिंदू परिषदेचे गणेश सपकाळ, बजरंग दलाचे विनोद थोरात, मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर, हिंदू एकता आंदोलनचे रामसिंग बावरी यांनी चर्चा केली़ पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.