सहारा कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:14 AM2021-04-18T04:14:30+5:302021-04-18T04:14:30+5:30
मालेगाव शहरातील एका ३५ वर्षीय युवकाला सहारा कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणीदेखील ...
मालेगाव शहरातील एका ३५ वर्षीय युवकाला सहारा कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली होती. मात्र कोरोना चाचणीचा अहवाल गेल्या तीन दिवसांपासून उपलब्ध झाला नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्यांना त्यांच्याकडे असलेले रेमडेसिविर इंजेक्शन दिले नव्हते. शनिवारी (दि.१७) मात्र सहारा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितले होते. मात्र, इंजेक्शन उपलब्ध होण्याच्या आधीच सदर तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारतानाच शाब्दिक चकमकही उडाली. या प्रकाराची माहिती माजी आमदार शेख यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शासनाच्या नियमानुसार रुग्णाला इंजेक्शन देण्याचा नियम आहे. संबंधित रुग्णांचा चाचणी अहवाल आला नसल्याने इंजेक्शन देता आले नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी माजी आमदार शेख यांना सांगितले. या विषयावर सहारा रुग्णालय परिसरात तब्बल तीन तास गर्दी व गोंधळाचे वातावरण होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माजी आमदार शेख यांची समजूत काढल्यानंतर या वादावर पडदा पडला.
दरम्यान, शहरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा दूर करावा, रेमडेसिविर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावे ,बंद पडलेले ऑक्सिजन प्लँट सुरू करून नागरिकांना वेळेवर सिलिंडरचा पुरवठा करावा आदी मागण्या माजी आमदार शेख यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
इन्फो
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
सहारा रुग्णालयात उपचारार्थ तरुणाला कोरोना आहे की नाही, याचा अहवाल येण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी माजी आमदार असिफ शेख यांनी केली होती. यावर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ, सपना ठाकरे यांनी मृतदेह ताब्यात देता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला व वादावर पडदा पडला.
फोटो- १७ मालेगाव सहारा
मालेगावी सहारा कोविड सेंटरमध्ये रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी केलेली गर्दी.
===Photopath===
170421\17nsk_29_17042021_13.jpg
===Caption===
फोटो- १७ मालेगाव सहारा मालेगावी सहारा कोविड सेंटर मध्ये रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी केलेली गर्दी.