समको बॅँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:03 PM2018-09-24T16:03:44+5:302018-09-24T16:04:01+5:30
हमरीतुमरी : सभासदांनी घेतला व्यासपीठाचा ताबा
सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स को-आॅप बँकेच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालकांविरूद्ध सभासदांनी आक्र मक भूमिका घेतल्याने गोंधळातच सभा पार पडली.
अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अलई होते. मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्ताचे वाचन सुरु असतांना गोंधळ सुरु झाला. ध्वनिक्षेपकाची ओढाताण करीत एकावेळेस तीन ते चार सभासद ध्वनिक्षेपकावर बोलू लागले. काही सभासदांनी तर शिवराळ भाषेत संचालक मंडळाविरुद्ध आरोप सुरू केले. या गोंधळातच काही सभासदांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. व्यासपीठावर बसलेल्या काही संचालकांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे महिला संचालक भेदरल्या अवस्थेत व्यासपीठाखाली उतरल्या. अखेर काही जेष्ठ सभासदांनी धुडगूस घालणाऱ्या सभासदांना शांततेचे आवाहन केल्यानंतर सभा पुर्ववत सुरु झाली.ज्या सभासदांनी ‘केवायसी’ पूर्तता केलेली नाही त्यांनी ६० दिवसांच्या आत पुर्तता करावी असे निर्देश संचालक मंडळाच्या वतीने जेष्ठ संचालक रमेश देवरे यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत जेष्ठ सभासद आण्णासाहेब सोनवणे, पंडितराव सोनवणे, बिंदू शर्मा, मनोहर देवरे, अरविंद सोनवणे, बाळासाहेब बिरारी, संजय सोनवणे, रत्नाकर सोनवणे, बाळू भांगिडया, जिभाऊ सोनवणे आदींनी भाग घेतला.अध्यक्ष राजेंद्र अलई, संचालक यशवंत अमृतकर,रु पाली कोठावदे, कैलास येवला यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. व्यासपीठावर उपाध्यक्ष कल्पना येवला, संचालक पंकज ततार, प्रवीण येवला, शरद सोनवणे, किशोर गहिवड, जयवंत येवला, दिलीप येवला, अशोक निकम, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, जगदीश मुंडावरे, विठ्ठल येवलकर उपस्थित होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा येवला यांनी प्रास्ताविक केले. भरत पवार यांनी इतिवृताचे वाचन केले.
हिशेब तपासणीसच्या पुर्ननियुक्तीला विरोध
सभेत २०१७-१८ या वर्षातील ताळेबंद, नफा तोटा पत्रक, अहवाल सालातील नफा वाटणी,सभासदांना भेट वस्तूंचे वाटप करणे या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली. अहवाल काळात ज्या हिशोब तपासणीची संचालक मंडळास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्याची पुन्हा नेमणूक करू नये असा ठराव करण्यात आला.