नाशिकमध्ये टीईटी परीक्षा केंद्रांवर गोंधळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 01:33 AM2021-11-22T01:33:56+5:302021-11-22T01:34:17+5:30
शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.
नाशिक : शहरात घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेसाठी अवघ्या काही क्षणांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थापनाकडून परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने अपवाद वगळता शहरातील बहुतांश केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षार्थीं गोंधळ घालत असलेल्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणत विलंबाने केंद्रावर पोहोचणाऱ्या उमेदवारांना बाहेर काढले. यातील बऱ्याच उमेदवारांनी बस बंद असल्याने खासगी वाहनांचा वापर केल्याचे सांगितले. त्यामुळे बंद एसटीचा फटकाही अनेकांना बसल्याचे वृत्त आहे.
नाशिक शहरातील मराठा हायस्कूल, नवरचना स्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, बॉईज टाऊन, उन्नती विद्यालय, पेठे विद्यालय, सीडीओ मेरी, रवींद्रनाथ विद्यालय, उंटवाडी माध्यमिक हायस्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, नाशिकरोड येथील पुरुषोत्तम विद्यालय यासारख्या जवळपास सर्वच परीक्षा केंद्रावर अवघ्या चार ते पाच मिनिटांच्या उशिराने पोहोचलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेशास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अनेक उमेदवारांना टीईटी परीक्षेच्या पहिल्या पेपरला मुकावे लागल्याने परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर एकच गोंधळ उडाला. संतापलेल्या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांविरोधात रोष व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करावा लागला. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे बससेवा ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अनेक परीक्षार्थी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचू शकले नाही. तर अनेकांना परीक्षा केंद्रावर पत्ता शोधण्यातच अधिक वेळ झाल्याने उशीर झाल्याची कारणे परीक्षार्थींनी दिली. मात्र, परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार कोणत्याही परीक्षा केंद्रावर निश्चित वेळेनंतर परीक्षार्थींना प्रवेश देण्यात आला नसल्याचे जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा प्राथमिक जिल्हाधिकारी राजीव म्हसकर यांनी दिली.