जिल्हा रुग्णालयात युवकांचा गोंधळ

By admin | Published: February 18, 2016 11:30 PM2016-02-18T23:30:12+5:302016-02-18T23:30:47+5:30

पोलीस भरती : उमेदवारांनी केसपेपर कक्षाच्या काचा फोडल्या; फलकही फाडले

The confusion of the youth in the district hospital | जिल्हा रुग्णालयात युवकांचा गोंधळ

जिल्हा रुग्णालयात युवकांचा गोंधळ

Next

नाशिक : पोलीस होण्याचे स्वप्न बघत भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्धवट माहितीच्या आधारे जिल्हा रुग्णालयात हुल्लडबाजी करत केसपेपर कक्षाला लक्ष्य करत काचा फोडल्या. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास झालेल्या गोंधळामुळे बाह्यरुग्ण तपासणी केंद्रात तणावाचे वातावरण पसरले होते. पोलीस दलाचे स्वप्न बघणाऱ्यांनी गैरवर्तन केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘असे पोलीस काय कायदा सुव्यवस्था राखणार’ असा प्रश्न उपस्थित केला.
कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्या दलावर आहे त्या दलात सेवा देण्याच्या उद्देशाने भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’या ब्रीदचा अर्थच ध्यानीमनी नसल्याचे जिल्हा रुग्णालयात बघावयास मिळाले. मुळात पोलीस भरतीच्या शारीरिक सक्षम चाचणीच्या अगोदर डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसतानाही जिल्हा शासकीय रुग्णालयात जमलेल्या उमेदवारांनी एकच गोंधळ घातला.
दरम्यान, केसपेपर कक्षावरून शासकीय शुल्क भरणा केल्याची पावती घेण्यासाठी गर्दी करत उमेदवारांनी कक्षामधील कर्मचाऱ्यांना दमबाजी केली, तर जमावातून काहींनी शिव्यांची लाखोलीही वाहिली. सकाळी साडेनऊ वाजेपासून जमलेल्या या उमेदवारांच्या जमावाने अक्षरक्ष: संपूर्ण बाह्यरुग्ण तपासणी केंद्र डोक्यावर घेतले होते. आपण एका रुग्णालयात उभे आहोत याचेही भान यापैकी कोणालाही नव्हते. जोरजोराने आरडाओरड करत ‘जिल्हा रुग्णालय प्रशासन हाय हाय’च्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. केसपेपर कक्षाभोवती उमेदवारांचा सुरू असलेल्या गोंधळाचा सर्वाधिक फटका उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना बसला. गर्दीमुळे अबालवृद्ध रुग्णांना केसपेपर काढणेही जिकिरीचे झाले होते.
यावेळी काही वृद्ध रुग्णांची चेष्टादेखील करण्याचा जमलेल्या उमेदवारांमधून काहींनी प्रयत्नही केला. सामाजिक बांधिलकी, पोलीस दलाचे कर्तव्य, भूमिका आणि जबाबदाऱ्यांचा कुठलाही अभ्यास या उमेदवारांकडे नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. उमेदवारांचा जिल्हा शासकीय रुग्णालयातील हैदोस वाढल्याची बाब सुज्ञ नागरिकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यासह नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी रुग्णालयात येऊन जमावाची समजूत काढली आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची कुठलीही गरज नसल्याचे पटवून दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The confusion of the youth in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.