टोल नाक्यावर कोंडी; भुजबळ उतरले रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:39 PM2020-12-25T17:39:28+5:302020-12-25T17:39:49+5:30
घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावरील टोल नाक्यावर शुक्रवारी (दि.२५) दुपारी दुतर्फा रांगा लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. याचवेळी या ठिकाणाहून मार्गक्रमण करणाऱ्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्यात थांबून वाहतूक सुरळीत केली.
नाताळाच्या सुट्ट्या आणि वीक एन्ड असल्याने मुंबई आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे घोटी टोल नाक्यावर दुतर्फा रांगा लागल्या होत्या. यावेळी मुंबईहुन नाशिकच्या दिशेने येत असतांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपला ताफा बाजूला थांबवून घोटी टोल नाक्यावर स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या. यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत छगन भुजबळ हे घोटी टोल नाका येथे थांबून होते. कोंडी सोडवताना ते प्रवाशांनाही दिलासा देत होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याप्रसंगी समता परिषदेचे तालुका अध्यक्ष शिवा काळे यांचेसह टोल प्रशासन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.