मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी

By admin | Published: February 4, 2017 01:21 AM2017-02-04T01:21:57+5:302017-02-04T01:22:17+5:30

रिंगणातून माघार : कॉँग्रेससाठी प्रभाग १२ मोकळा

Congress and NCP alliance for municipal elections | मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी

मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी

Next

 नाशिक : महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून दोन्ही कॉँग्रेसमध्ये आघाडी होण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम उमेदवारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी संपुष्टात आला. आघाडी तुटण्यास कारणीभूत ठरू पाहणाऱ्या प्रभाग क्रमांक १२ मधील हक्काची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी कॉँगे्रससाठी सोडून देत आघाडीचा धर्म पाळला.
महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही कॉँग्रेसची आघाडी व्हावी, अशी मनोमन कार्यकर्त्यांनी इच्छा असली तरी, काही पदाधिकाऱ्यांना ती नको असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते, त्यामुळे आघाडी करण्यासाठी थेट राष्ट्रवादीचे अजित पवार, कॉँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तयारी दर्शवून स्थानिक पातळीवर त्यासाठी अधिकारही दिले होते. तथापि, आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागावाटप व प्रभागवाटप करण्यावरून मतभेद निर्माण झाले होते.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवसाचा कालावधी शिल्लक असतानाही एकमत होत नसल्याने शुक्रवारी पहाटे तीन वाजेपर्यंत गुप्त खलबते झाली. प्रभाग बारामधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मातोश्री छाया ठाकरे या विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांच्यासाठी प्रभागाच्या जागेची मागणी राष्ट्रवादीने लावून धरली. परंतु कॉँग्रेसने या प्रभागात परस्पर पॅनल तयार करून त्यांच्या उमेदवारांच्या नावांचीही घोषणा केली, त्याला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला.
कॉँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समक्ष आघाडीसाठी निवडणूक न लढविण्याचा दिलेला शब्द मागे घेत, उमेदवारी करण्यासाठी हट्ट धरला, परिणामी छाया ठाकरे यांना जागा सोडण्यास कॉँग्रेसने नकार दिला, अखेर जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी व समविचारी मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माघार घेत, प्रभाग बारा कॉँग्रेससाठी सोडत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीने केलेल्या त्यागाची कॉँग्रेसने जाणीव ठेवावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress and NCP alliance for municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.