कॉँग्रेसच्या सहा नगरसेवकांची फाटाफूट?
By admin | Published: September 12, 2014 12:40 AM2014-09-12T00:40:21+5:302014-09-13T00:55:31+5:30
कॉँग्रेसच्या सहा नगरसेवकांची फाटाफूट?
नाशिक : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांत फाटाफूट सुरू असून, कॉँग्रेसचे तीन नगरसेवक अगोदरच ‘नॉट रिचेबल’ असून, आणखी तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. आमदार कोकाटे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कॉँग्रेस शहराध्यक्षांनी कोकाटे यांनाच साकडे घातले आहे. तसेच या नगरसेवकांच्या घरावर पक्षादेश चिटकवण्यात येणार आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने अन्य पक्षांचे उमेदवार फोडण्यास सुरुवात केल्यानंतर कॉँग्रेसचे तीन नगरसेवक कॉँग्रेसच्या संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. कॉँग्रेसचे सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांचे समर्थक असलेले हे तीन नगरसेवक असून, कोकाटे हे सध्या शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याने त्यांचे समर्थक शिवसेनेलाच मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर यांनी मात्र तिन्ही नगरसेवक कॉँग्रेस संपर्कात असल्याचा दावा केला आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनीदेखील तिन्ही नगरसेवक कॉँग्रेसलाच मतदान करतील, असा शब्द दिल्याचे अहेर यांनी सांगितले. संबंधित तिन्ही नगरसेवकांच्या घरांवर पक्षादेश चिटकवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कॉँग्रेसचे गटनेता उत्तमराव कांबळे यांनी आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी, आणि मनसे एकत्र आल्याने पक्षाची सत्ता येण्याची चिन्हे असून, त्यामुळे अन्य पक्षाच्या संपर्कात असलेले आघाडीलाच मतदान करतील, असा दावा केला. (प्रतिनिधी)