गाव तेथे शाखा उघडण्याचा कॉँग्रेसचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 07:58 PM2020-02-20T19:58:40+5:302020-02-20T19:59:23+5:30
केंद्र सरकार हे सातत्याने भाजप व आरएसएस या संघटनेचा झेंडा राबवत असून, सातत्याने संविधान विरोधी भूमिका घेत आहे याचाच एक भाग म्हणून एका मोठ्या राज्याच्या न्यायालय निकालाच्या आधारावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कॉँग्रेसच्या जिल्हा, शहर पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आगामी काळात गाव तेथे शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या संविधान विरोधी भूमिकेवर टीका करून आरक्षणाला धक्का लावण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला विरोध करण्याचे ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते.
केंद्र सरकार हे सातत्याने भाजप व आरएसएस या संघटनेचा झेंडा राबवत असून, सातत्याने संविधान विरोधी भूमिका घेत आहे याचाच एक भाग म्हणून एका मोठ्या राज्याच्या न्यायालय निकालाच्या आधारावर केंद्र सरकार मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करत असून, त्याला काँग्रेस पक्ष प्रचंड प्रमाणात विरोध करत आहे. केवळ विरोधच नाही तर त्याविरोधात देशभर आंदोलन उभे करेल, असा इशारा जिल्हा अध्यक्ष शेवाळे यांनी दिला. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारचा आरक्षण विरोधी धोरणाचा विरोध करत पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने त्याचा फायदा उठवित शहर व जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आघाड्यांना बळ देऊन त्यांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नजीकच्या काळात गाव तिथे शाखा यादृष्टीने प्रत्येक गावात शाखा उघडण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, विजय राऊत, दिगंबर गिते, राजेंद्र बागुल, निर्मलाताई खर्डे, रमेश कहांडोळे, सुरेश मारू आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वत्सला खैरे, यशवंत पाटील, नंदकुमार कर्डक, मोहन करंजकर, समिना पठाण, लक्ष्मण धोत्रे, समीर देशमुख, विनायक सांगळे, भरत टाकेकर, वसंत ठाकूर, संजय जाधव, बबलू खैरे, उद्धव पवार, रामचंद्र चौधरी, कैलास कडलग, दिनेश निकाळे, अशोक टोंगारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रतन जाधव यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काळे यांनी केले.