वर्चस्व काँग्रेसचे; समीकरणे वेगळीच
By admin | Published: January 28, 2017 12:54 AM2017-01-28T00:54:22+5:302017-01-28T00:54:34+5:30
ठाणापाडा गण : तिकीट वाटपाकडे लक्ष
वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर आतापर्यंत कॉँग्रेसचे वर्चस्व असले तरी गट आणि गणातील राजकीय समीकरणे वेगळीच असल्याचे चित्र सातत्याने दिसून आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तिकीट कोणाला मिळते अन् कोणाचे तिकीट कापले जाते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाणापाडा गण अगदी गुजरात सीमेवर असून, त्र्यंबकेश्वर तालुक्याचे शेवटचे टोक म्हणजे गुजरातला सुजलाम् सुफलाम् करणारी दमणगंगा नदी याच गावातून वाहते. दमणगंगेची वाळू या भागातून नेतात. या भागाला डोंगर, दऱ्यांचे सौंदर्य लाभले आहे. अशा या गणाने सन २००२ मध्ये (पूर्वीचा खरशेत गण) जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण सभापतिपद भूषविलेले राष्ट्रवादीचे पुंडलिक साबळे, तर मोतीराम पागी हे पूर्वीच्या खरशेत गणातून निवडलेले गणातील उमेदवार उपसभापती होते. सन २००७ मध्ये ठाणापाडा गट-गणावर माकपने वर्चस्व मिळवून अवघ्या दोन सदस्यांवर सभापतिपद राखले होते. त्यावेळेस काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे बहुमत असूनही ते काहीच करू शकले नाही. अंजना राऊत या ठाणापाडा गणातून, तर रमेश बरफ हे मूळवड गणातून माकपच्या तिकिटावर निवडून आले होते. यावेळेस दोघांनाही सभापतिपदाची संधी मिळाली होती. ठाणापाडा गणात कागदपत्रे पाहता अनेक कामे ‘कागदावर’ झालेली दिसून येतात.
सन २०१२मध्ये काँग्रेसने हा गट जिंकला. ठाणापाडा गट ओबीसी (महिला) राखीव होता. या गटातून याच भागात सेवा झालेले वन विभागातचे पुंडलिक गिते यांच्या पत्नी निर्मला गिते यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळून त्या गटातून निवडून आल्या, तर मूळवड गणातून योगीता मौले व ठाणापाडा गणातून मंगळू निंबारे हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे तीन पंचवार्षिकमध्ये प्रथम सभापतिपदाचा मान फक्त महिलांना मिळालेला आहे. त्र्यंबक तालुका अनुसूचित क्षेत्रातील असून, या जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
या गणात गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व राहिले असून, पूर्वी हा गण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. तथापि, नंतरच्या काळात पक्षाने अनेकवेळा शासकीय योजना आमच्यापर्यंत पोहचत नाहीत, आधार कार्ड, रेशन कार्ड (पिवळे) वनहक्क जमिनी नावावर होणे आदि प्रश्नांवर आंदोलने केली.
मागील वर्षी केलेले आंदोलन चिघळून दंगल उसळली होती. मात्र तीन पंचवार्षिकपैकी फक्त २००७ च्या निवडणुकीत ठाणापाडा गटावर १ गट व २ गणावर वर्चस्व मिळविल्या खेरीज माकपला मतदारांनी नाकारले होते. यावेळेस काय चित्र असेल ते लवकरच समजेल.