बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला!
By मुकेश चव्हाण | Published: March 18, 2023 06:55 PM2023-03-18T18:55:10+5:302023-03-18T19:08:58+5:30
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाच्या खासदार प्रितम मुंडे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी यांनी अठरापगड जातीसाठी काम केले असून आपल्या कामामुळे ते लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याचे सांगताना शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन नक्की देईल, असं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
#नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री श्री.@Nitin_gadkari जी यांच्यासह उपस्थित राहून माझे मनोगत मांडले. pic.twitter.com/xruC1GaxHf
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 18, 2023
बाळासाहेब थोरात यांनी देखील या कार्यक्रमात भाषण केले. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्यासह एकनाथ शिंदे यांचं बाळासाहेब थोरात यांनी तोंडभरुन कौतुक केलं. नितीन गडकरींची प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे, ही कोणीही नाकारु शकत नाही. कुठेही जा...रिक्षा चालवणाऱ्याला विचारा किंवा रस्त्यावरील हमाल करणाऱ्याला विचारा...देशातील लोकप्रिय मंत्री कोण?, असा प्रश्न विचारल्यास नितीन गडकरी यांचं नाव घेतलं आहे, असं बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.
बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं. एकनाथ शिंदेसाहेब आपण मुख्यमंत्री आहात, तुम्हाला संधी मिळाली आहे. काम करताय, मात्र आमची संधी घालवली हेदेखील खरंय, असं बाळासाहेब थोरात म्हणताच एकनाथ शिंदेंसह सर्वांना हसू आले. पण तुम्ही खूप मेहनती आहात, हे विसरुन जाता येत नाही. जो काही वेळ मिळतोय, जी संधी मिळेल, जास्तीत जास्त लोकांचं काम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, हे आम्ही देखील पाहतोय, असं कौतुक बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं यावेळी केलं.
एकनाथ शिंदेंची घोषणा अन् पंकजा मुंडेंनीही वाजवल्या टाळ्या
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी पंकजा मुंडेंनी केलीय. अनेक शहरांची नावे त्यांनी घेतली. मी याठिकाणी शब्द देतो की, या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू होईल, असे म्हणद मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले. त्यावेळी, पंकजा मुंडेंनी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत या घोषणेवर आनंद व्यक्त केला. तसेच, पंकजाताई म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक नका उभारू, पण हॉस्पीटल उभारा तर मी आत्ताच सांगतो, मुंडे साहेबांचं स्मारकसुद्ध होईल आणि हॉस्पीटलसुद्धा होईल, अशी घोषणाच मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.