सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते भूमिका विसरले : विखे पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:55 PM2020-01-30T23:55:48+5:302020-01-31T00:43:39+5:30
इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
नाशिक : इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
नाशिकमध्ये विभागीय आाढावा बैठकीप्रसंगी आलेल्या विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरदेखील टीका केली. इंदिरा गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी कॉँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी आपणाला आश्चर्य वाटते अशी प्रतिक्रिया देतानाच सत्तेच्या राजकारणात आपल्या नेत्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सौम्य भूमिका घेणाऱ्या कॉँग्रेस नेत्यांवर त्यांनी टीका केली.
विभागीय आढावा बैठक हा राज्यातील नव्या सरकारचा प्रयोग आहे. नव्या पक्षांबरोबरचा प्रयोग हा असाच नवीन प्रकार आहे. कृतीमध्ये आणि प्रत्यक्षात काम करणे यात फरक आहे. आगामी काळात प्रत्यक्षातील कामकाजावरून ते कळेलच, असेही विखे पाटील म्हणाले. शिवसेना आणि भाजप अजूनही एकत्र येऊ शकतील असे मुनगंटीवर म्हणाले, याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी प्रत्यक्षात मुनगंटीवारांबरोबर काय चर्चा झाली मला माहीत नाही, परंतु सेना-भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत ते एकत्र येण्यात काहीच वावगे नसल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षविरोधी कामकाज केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून होत असल्याबद्दल विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाने चौकशी समिती नियुक्तकेली आहे. समितीसमोर आपण आपली बाजू मांडली आहे. समिती आपणाला न्याय देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्यावेळी विरोधकांचाच संशय
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिल्याप्रकरणी राज्य सरकारने केंद्रावर पक्षपाती पणाचा आरोप केला आहे याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यापूर्वी विरोधात असताना कोरेगाव-भीमा तपासाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता, आता सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका कशी बदलली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.