कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी गोंधळात
By admin | Published: December 28, 2016 01:33 AM2016-12-28T01:33:20+5:302016-12-28T01:33:32+5:30
आघाडीचा प्रश्न : विखे पाटील यांच्या विधानानंतर सारवासारव
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आघाडी करावी किंवा नाही याबाबत फेरविचार करण्यात येणार असल्याचे विधान कॉँग्रेस नेता आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने उभय पक्षांचे स्थानिक नेते बुचकळ्यात पडले आहेत. या दोन्ही पक्षांची आघाडी करण्याची तयारी केल्यानंतर प्रत्यक्ष बोलणीस सुरुवात होणार असतानाच विखे यांनी नकारात्मक विधान केल्याने अडचण झाली आहेत.
कॉँग्रेसने फेरविचार होणार असला तरी आघाडी होण्याचीच शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट केले असून, राष्ट्रवादीने मात्र कॉँगे्रसने फेरविचार करावाच मगच भूमिका स्पष्ट करू, अशी भूमिका घेतली आहे.
फेबु्रवारी महिन्यात नाशिक महापालिकेची निवडणूक होणार असून, त्यासाठी चार सदस्यीय प्रभाग असल्याने सर्वच राजकीय पक्षांची अडचण झाली आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची तर अधिक अडचण असून, अशा स्थितीत चार उमेदवार मिळवण्यासाठी उभय पक्षांना एकत्र येणे अपरिहार्य ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात आघाडी करण्याचे ठरविण्यात आले. कॉँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर पक्षाचे नेते भाई जगताप यांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन आघाडीचा निर्णय जाहीर केला तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसशी चर्चा करण्यासाठी समन्वय समिती तयार करण्याची घोषणा केली, परंतु तसे होण्याच्या आताच विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचा पाय खोलात असल्याने कॉँग्रेसही अडचणीत येऊ नये यासाठी आघाडीचा फेरविचार करण्यात येईल, असे सांगितले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना यापूर्वीच अटक झाली आहे, तर माजी खासदार देवीदास पिंगळे यांना बाजार समितीच्या ५७ लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी कारागृहाची हवा खावी लागली आहे. पाठोपाठ एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा माजी शहराध्यक्ष छबू नागरे आणि रामराव पाटील यांना अटक झाली आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने कॉँग्रेसही अडचणीत येऊ शकते, तसे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेताना सांगण्यात आल्याने त्या धर्तीवर विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत आघाडीचा फेरविचार करू, असे सांगितले. मात्र, त्यामुळे स्थानिक पदाधिकारी अडचणीत आले आहेत. अनेकांनी तर आघाडी झाली नाहीच तर परस्पर प्रभागात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पॅनल तयार करण्याचा पर्याय शोधला आहे. (प्रतिनिधी)