काँग्रेस, राष्ट्रवादीचा चक्का जाम
By admin | Published: March 25, 2017 11:06 PM2017-03-25T23:06:33+5:302017-03-25T23:06:50+5:30
सटाणा : कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तब्बल एकोणावीस आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज येथील बसस्थानकाजवळ कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला.
सटाणा : सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणाऱ्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तब्बल एकोणावीस आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ आज येथील बसस्थानकाजवळ कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला. कार्यकर्त्यांनी अर्धा तास घोषणाबाजी करून विंचूर-प्रकाशा मार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती.राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, नोटाबंदीमुळे बँकेचे व्यवहार विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी केली. अशा वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केली. शेतकऱ्यांना मंत्रालयात मारहाण केली जाते. डॉक्टरांना सरकार न्याय मिळवून देत नाही. अशा विविध प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारून न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री यांनी लोकशाहीची पायमल्ली करून हुकूमशाहीचा वापर केला. आणि तब्बल एकोणावीस आमदारांना निलंबित केले. जनतेच्या प्रश्नावर भांडणाऱ्या लोकप्रतिनिधींवर हा मोठा अन्याय आहे. त्याचा निषेध करून आज सकाळी ११ वाजता येथील बसस्थानकाजवळ चक्का जाम करून भाजपा सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.
सरकारने अशा अन्यायग्रस्त आमदारांचे तत्काळ निलंबन मागे घ्यावे अन्यथा आगामी काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांना सादर केले.आंदोलनात कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, गटनेते दिनकर सोनवणे, प्रा.जी.के. कापडणीस, ज.ल. पाटील, सिराज मुल्ला, भगवान सोनवणे, सुनील पवार, दिनकर निकम, चंद्रकांत सोनवणे, बब्बू शेख, सचिन साकला, मधुकर खैरनार, गंगाधर चव्हाण, ज्ञानेश्वर अहिरे, रामदास शेवाळे, नारायण सावंत, भास्कर पवार, सुरेश कंकरेज, आधार खैरनार, दीपक शेवाळे, सुनील चव्हाण, सचिन सोनवणे आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)