काँग्रेस, राष्ट्रवादीची विदारकता उघड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:52 AM2017-12-17T01:52:35+5:302017-12-17T01:54:46+5:30

इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांचे निवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे शिवसेना व भाजपाच्या पक्षात गेले, परंतु तसे होताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या पद्धतीने पूर्णत: सफाया झालेला दिसून आला ते पाहता, या दोन्ही पक्षांतील संघटनात्मक स्थितीची विदारकता स्पष्ट होऊन गेली आहे. उद्याच्या राजकारणाच्या दृष्टीने या पक्षांना सावध होण्याचे संकेतही यातून मिळून गेले असून, त्यातून ते काय बोध घेतात हेच आता पाहायचे!

Congress, NCP's discreet disclosure! | काँग्रेस, राष्ट्रवादीची विदारकता उघड!

काँग्रेस, राष्ट्रवादीची विदारकता उघड!

Next
ठळक मुद्देनिवडणुका स्थानिक संदर्भाने व मुद्द्यांवर लढल्या जातातकाँग्रेस-राष्ट्रवादीचा सफाया कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यायचा?राजकारणाने कोणती व कशी पातळी गाठली याचा परिचय

साराश
किरण अग्रवाल
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांचे निवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे शिवसेना व भाजपाच्या पक्षात गेले, परंतु तसे होताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्या पद्धतीने पूर्णत: सफाया झालेला दिसून आला ते पाहता, या दोन्ही पक्षांतील संघटनात्मक स्थितीची विदारकता स्पष्ट होऊन गेली आहे. उद्याच्या राजकारणाच्या दृष्टीने या पक्षांना सावध होण्याचे संकेतही यातून मिळून गेले असून, त्यातून ते काय बोध घेतात हेच आता पाहायचे!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक संदर्भाने व मुद्द्यांवर लढल्या जातात हे खरे, पण त्यांचा निकाल मात्र या परिसरातून वरिष्ठ स्तराचे प्रतिनिधित्व करणाºयांसाठी संकेत देणाराच म्हणवला जातो. जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिकांचे निकाल तसे अपेक्षेप्रमाणेच लागले असले तरी, त्यातूनही असेच काहीसे संकेत मिळून जाणारे आहेत. विशेषत: भाजपा व शिवसेनेने एकेका संस्थेवरील वर्चस्व राखले असले तरी, दुसरीकडे झालेली त्यांची पडझड व काँग्रेस-राष्ट्रवादीचा सफाया हा या साºयाच पक्षांची विदारक स्थिती दर्शवून देणारा ठरला आहेच, शिवाय त्र्यंबकच्या नूतन नगराध्यक्षांना झालेली मारहाण पाहता राजकारण कुठल्या वळणावर चालले आहे, याचीही चुणूक दिसून आली आहे.
इगतपुरीतील सुमारे २५ वर्षांपासूनचा प्रभाव शिवसेनेने कायम राखला असून, त्र्यंबकेश्वरातील सत्ता राखत भाजपानेही समाधानाचा ढेकर दिला आहे. या दोन्ही ठिकाणी एकहाती सत्ता मिळविणाºया अनुक्रमे शिवसेना व भाजपा या पक्षांसाठी ही तशी निश्चितच आनंदाची बाब आहे. पण तसा आनंद मानून घेताना भाजपा इगतपुरीत व शिवसेना त्र्यंबकेश्वरमध्ये का चालू शकली नाही, याचाही विचार या पक्षांनी केला तर ते त्यांच्याच हिताचे ठरणार आहे. यात भाजपाला त्र्यंबकच्या सत्तेखेरीज इगतपुरीत प्रथमच चार जागा मिळाल्या, हा त्यांचा ‘बोनस’ म्हणावा. पण, केंद्रात व राज्यात सत्ता भूषविणाºया या पक्षाला इगतपुरीतच काय, त्र्यंबकेश्वरातही स्वत:च्या केडरमधला उमेदवार नगराध्यक्षपदासाठी देता आला नाही, त्यासाठी आयातांचा आसरा घ्यावा लागला; यातून पक्षनिष्ठांनी व आजवर केवळ सतरंज्याच उचलत आलेल्या कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यायचा? कारण, इगतपुरीत तर वर्षानुवर्षांच्या सत्ताधाºयांबद्दल आकारास येणारा ‘अ‍ॅण्टी इन्कम्बसी’ म्हणजे नकारात्मकतेचा ‘फॅक्टर’ कामात येऊ शकणारा होता. परंतु भाजपाची पक्षबांधणीच नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादीतून आलेल्यांच्या भरोशावर निवडणूक लढली गेली. त्र्यंबकमध्ये पक्षाने भलेही दिग्विजय नोंदविला, परंतु ते होत असताना पक्षाचे तालुकाध्यक्षपद भूषविलेल्या व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचेही दावेदार राहिलेल्या डॉ. दिलीप जोशी यांचे पुत्र व पक्षाच्या शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ. माधुरी जोशी यांचे पती वैभव मात्र पराभूत होतात. पक्षाचे अधिकृत कोणतेही पद नसलेल्या परवेज कोकणी यांची त्यांना मदत होते, परंतु प्रभागात पक्षाचे पदाधिकारी व आजी-माजी नगराध्यक्ष असताना अशी ‘विकेट’ जाते; नव्हे, सुरक्षित म्हणविणाºया वॉर्डात त्यांचा पराभव होतो. यामागील कारणांचा शोध घेतला तर भाजपा सत्तेत आली असली तरी त्या पक्षात सारे आलबेल नाही असेच दिसून येते. इगतपुरीतील यश हे शिवसेनेचे नसून तेथे या पक्षाचे नेतृत्व करणाºया संजय इंदुलकर यांचे आहे. कायम राहिलेल्या सत्तेची नकारात्मकता न येऊ देता त्यांनी माणसे जोडण्याचे राजकारण केले. भाजपाने आपल्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पोखरल्याचे पाहून इंदुलकरांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांच्याच पत्नीला शिवसेनेत घेऊन वेगळी खेळी केली. गेल्या वेळी स्वतंत्र आघाडी करून लढलेल्या नईम खान यांना आपल्या सोबत घेतले. अन्य पक्षीय व आघाडीच्या मतविभागणीमुळेही शिवसेनेचा विजय सुकर झाला. असा लाभ भाजपालाही करून घेता आला असता, मात्र ते गणित जमू शकले नाही. दीर्घकाळ सत्तेचे सूत्रधार राहूनही इंदुलकर कधी जिल्ह्याच्या वा राज्याच्या राजकारणात डोकावले नाहीत. त्यांनी आपले क्षेत्र ठरवून घेतले होते. त्यामुळेच इगतपुरीतील यशाचे श्रेय त्यांनाच देता येणारे आहे. अन्यथा, त्र्यंबकेश्वरमध्येही त्यांचा पक्ष तितक्याच ताकदीने उतरला असताना तेथे अवघ्या दोन जागांवर थांबावे लागले नसते. तेथे तर काँग्रेस ते भाजपामार्गे शिवसेनेत आलेल्यास नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी देण्यात आली होती. मात्र डाळ शिजू शकली नाही. थोडक्यात, भाजपा व सेना या दोघांनी त्र्यंबक आणि इगतपुरीत सत्ता राखल्या असल्या तरी, या निवडणूक निमित्ताने उघड झालेल्या उणिवांकडेही लक्ष देणे त्यांच्यासाठी गरजेचेच ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला नाचक्कीदायक पराभवाचा सामना करावा लागल्याने या दोघा पालिकांचे क्षेत्र असलेल्या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार सौ. निर्मला गावित यांना सावधानतेचा संकेत मिळून गेला आहे. राष्ट्रवादीला तर इगतपुरीत एकही उमेदवार उभा करता आला नाही, आणि त्र्यंबक मध्येही १७ पैकी अवघ्या चारच जागा लढवता आल्या, हे या पक्षासाठी अधिक शोचनीय ठरणारे आहे. जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा आम्हीच पुढे, अशी टिमकी वाजविणाºया राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी व पदाधिकाºयांनी अंतर्मुख व्हावे अशी ही स्थिती राहिली. त्यामुळे या निवडणुकांत राष्ट्रवादीचा संपूर्ण सफाया होणे यात फारसे विशेष नाही, पण इगतपुरीत १४ व त्र्यंबक मध्ये ११ जागा लढविलेल्या काँग्रेसचाही धुव्वा उडाला; ही नक्कीच नाचक्कीदायी बाब म्हणायला हवी. या क्षेत्राचे विधानसभेतले प्रतिनिधित्व दुसºयांदा काँग्रेसच्या सौ. गावित यांच्याकडे असताना ही दाणादाण उडाली हे यातील विशेष. यावरून पक्षाचे लोकप्रतिनिधी पक्ष रुजवतात, वाढवतात की स्वत:चे सुभे सांभाळण्यात धन्यता मानतात याची परीक्षा व्हावी. सर्वत्र बेरजेचे राजकारण सुरू असताना आमदारांमुळे काँग्रेसचे निष्ठावंत दुरावल्याची बाब नेहमी चर्चिली जाते, त्यामुळे तर हे ओढवले नाही ना, याचीही यानिमित्ताने खातरजमा होणे गरजेचे ठरले आहे. ती पक्षपातळीवर जरी नाही केली गेली तरी, या निकालातून खुद्द आमदारांना मिळून गेलेला संकेत त्यांनी गांभीर्याने घेतला तरी पुरे ठरावे. दुसरे म्हणजे, निकालानंतर त्र्यंबकचे नूतन नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांना मारहाण झाल्याची घटना घडून आली. ती कशामुळे केली गेली असावी, याबद्दल पूर्व वैमनस्याचे कारण दिले जात असले तरी, भाजपा शहराध्यक्षाने त्यामागे भाजपाचे यश पाहावले न गेलेल्या शक्ती असल्याचे म्हटले आहे. या प्रकारानंतर आपल्या जीवितास धोका असल्याची भीतीही त्यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. ही बाब म्हणजे, राजकारणाने कोणती व कशी पातळी गाठली याचा परिचय देणारीच आहे. निवडणुकीचे राजकारण वा त्याती ल हमरी-तुमरी प्रचारापुरती न राहता निकालानंतरच्या काळात कोणते रूप घेऊन पुढे येते, याचे हे ताजे उदाहरण ठरावे. ते भीतिदायक असून, चांगली माणसे राजकारणाच्या फंदात पडण्यापासून परावृत्त होण्यास कारणीभूत ठरू शकणारेही आहे. तेव्हा, अशा घटनांचा एकूणच समाजाकडून निषेधच होणे अपेक्षित आहे.

Web Title: Congress, NCP's discreet disclosure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.