कॉँग्रेसचा जनसंघर्ष विरोधकांशी नव्हे स्वकीयांशीच
By श्याम बागुल | Published: October 9, 2018 03:02 PM2018-10-09T15:02:29+5:302018-10-09T15:03:18+5:30
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल
नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेविरूद्ध रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेच्या नाशिक जिल्ह्याच्या दौ-याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना काहीशी उभारी मिळाली असली तरी, या यात्रेच्या नियोजनात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांनी हात अखडता घेणे व यात्रेच्या पार्श्वभुमीवर शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी शिष्टमंडळांनी जोरदार फिल्डींग लावणे या दोन्ही बाबी पाहता, जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसला विरोधकांशी नव्हे तर स्वकीयांशीच संघर्ष करण्याची वेळ अजुनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल झाली. पुर्वनियोजीत वेळेनुसार या यात्रेचे काहीसे उशिराने आगमन झाल्यामुळे पुढचे सारे नियोजन ढासळले. यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांना ताटकळावे लागले तर सभाही दोन तास उशिराने सुरू झाल्यामुळे प्रमुख नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या नाशिककरांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. रविवारी रात्री मुक्कामी व सोमवारी यात्रा नाशकात तळ ठोकून मंगळवारी पुढच्या दौºयासाठी रवाना होणार असल्याचे यापुर्वी जाहीर करण्यात आले होते. तथापि, नाशिक जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाच्या एकूणच अवस्थेविषयी अवगत असलेल्या पक्ष नेतृत्वाने नाशिकचा दौरा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शनिवार, रविवार लागून दोन दिवस येत असल्यामुळे व पुढे नवरात्रौत्सव सुरू होत असल्यामुळे ही यात्रा नियोजीत दिवसातच पुर्ण करण्याचा प्रदेशने निर्णय घेतल्यामुळे नाशिकला दोन दिवस यात्रा थांबली तथापि, गंगाघाटावरील जाहीर सभा वगळता या यात्रेचे अस्तित्व शहरात कुठेच जाणवले नाही. त्यामागचे कारणेही अनेक असून, यात्रेच्या नियोजनासाठी येणाºया खर्चाची तजवीज कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागात तीन सभा व शहरात एक सभा असल्याने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांवर त्याची जबाबदारी टाकण्यात आली असली तरी, यात्रेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याची मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे ज्यांनी ही मोहीम राबविली त्यांच्यावर यात्रेच्या यशस्वीतेची जबाबदारी टाका असा पवित्रा घेवून त्यातून बेबनाव निर्माण झाला. परिणामी यात्रेच्या निमित्ताने विरोधकांशी संघर्ष करण्याऐवजी स्वकीयांशी लढण्याची वेळ स्थानिक नेतृत्वावर आली. आता हा संघर्ष पदाधिकारी बदलापर्यंत कायम राहील.