राज्यात कॉँग्रेस पक्ष क्रमांक एकवर !
By admin | Published: July 17, 2016 12:32 AM2016-07-17T00:32:46+5:302016-07-17T00:35:14+5:30
शिक्षणखात्याचे राज्यशास्त्र : दहावीच्या पुस्तकात दोन वर्षांपूर्वीची आकडेवारी
नाशिक : राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झाले आणि भाजपाने सर्वाधिक जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, दहावीच्या यंदाच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात अद्यापही कॉँग्रेस हा प्रथम क्रमांकाचा पक्ष असून, भाजपाला विधानसभेत केवळ ४६ जागाच असल्याचे अजब राज्यशास्त्र शिकवले जात आहे. नाशिकच्या रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पिंगळे यांनी यासंदर्भात राज्यशास्त्रातील चुका थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन पाठवून उघड केल्या आहेत.
इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात सामाजिकशास्त्र विषयात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या चार विषयांचा समावेश करण्यात आला आहे. चार विषयांत मिळून शंभर गुण आहेत. त्यातील २० गुण शाळेकडे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस किंवा आयपीएस व्हायचे आहे, त्यांच्या दृष्टीने हे सर्व आवश्यक आहेत. त्यातच अशा गंभीर चुका करण्यात आल्या आहेत. राज्यशास्त्राच्या पुस्तकात विषय क्रमांक ९० वर भाजपाला अवघ्या ४६ जागा दाखविण्यात आल्या असून, कॉँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष असून, त्याला अवघ्या ८१ जागा दाखविल्या आहेत. हा जुना म्हणजेच दोन वर्षांपूर्वीचा इतिहास शिकवला जात आहे. आता भाजपाला १२२ जागा मिळाल्या असून, हा पक्ष राज्यात कॉँग्रेस धार्जिण्या अधिकाऱ्यांनी अभ्यासक्रम बदलण्याचे कष्ट जाणीवपूर्वक घेतले नाही काय याची चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्यशास्त्राच्या पुस्तकात चार प्रकरणे असून, आठ धड्यांचा समावेश आहे. त्यात लोकशाही, राजकीय पक्ष, जात व लोकशाही, धर्म व लोकशाही तसेच लोकशाही पुढील आव्हाने या प्रकरणांचा समावेश आहे. हे सर्व प्रकरणे महत्त्वाचे असताना त्यांना केवळ आठ गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकतर धडे कमी करावेत किंवा गुण वाढवून देण्याची गरज असल्याचे तावडे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले
आहे. (प्रतिनिधी)