मनसेचा आघाडीचा प्रस्ताव कॉँग्रेसने फेटाळला !

By admin | Published: November 8, 2016 01:10 AM2016-11-08T01:10:16+5:302016-11-08T01:08:18+5:30

शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट : राष्ट्रवादीबरोबर मात्र आघाडी करणार

Congress rejects MNS's top proposal! | मनसेचा आघाडीचा प्रस्ताव कॉँग्रेसने फेटाळला !

मनसेचा आघाडीचा प्रस्ताव कॉँग्रेसने फेटाळला !

Next

नाशिक : गेल्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना धक्का देऊन चाळीस जागा मिळवणाऱ्या मनसेला गळती लागली आहेच, परंतु महापालिकेत त्यांच्या मदतीने सत्तेची ऊब घेणाऱ्या मित्रपक्षांनी त्यांची साथ नकोशी झाली आहे. मनसेने कॉँग्रेस पक्षाला दिलेल्या आघाडीच्या प्रस्तावानंतर कॉँग्रेसने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर मनसेच्या काळातील गैरप्रकारांवरील मुद्दे प्रचारात आणून ही निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी आघाडीबाबत चर्चा करताना मनसेला बरोबर घेण्यासंदर्भातही चर्चा झाली. नाशिक महापालिकेत मनसेबरोबर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांची महाआघाडी आहे. त्यामुळे मनसेला बरोबर घेण्याबाबत चर्चा झाली, परंतु आता कॉँग्रेसने मनसेबरोबर जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांनी सांगितले की, मनसेला कॉँग्रेसबरोबरील महाआघाडीत सामील व्हायचे असल्याने त्यांनी तसा प्रस्ताव दिला होता. मनसे नेता डॉ. प्रदीप पवार यांनी कॉँग्रेसचे शैलेश कुटे यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच अन्य नेत्यांनी विविध माध्यमांतून कॉँग्रेसकडे प्रस्ताव दिला होता. मात्र, मनसेबराबर आघाडी करायची नाही, असे कॉँग्रेसने ठरविले असल्याचे सांगितले.
याउलट आता कॉँग्रेस आता मनसेच्या विरोधात प्रचार करणार आहे. महापालिकेत कॉँग्रेस पक्षाने मनसेला सत्तेसाठी साथ दिली असली तरी त्यांच्या चुकीच्या कामांना विरोध केला. तशी नोंद महासभांच्या इतिवृत्तात आहे, असे शरद अहेर आणि मनपातील काँग्रेस गटनेता शाहू खैरे यांनी सांगितले. तर प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी राज ठाकरे यांनी नाशिककरांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. महापालिकेतील सत्ता मिळाल्यास नाशिक शहरातील गुंडगिरी मोडीत काढू, असे राज यांनी सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात गुंडगिरी आणि गुन्हेगारी वाढत आहे. चालू वर्षी आत्तापर्यंत तीसहून अधिक खून झाले आहेत. दरोडे, लूट अशा सर्वच घटना वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Congress rejects MNS's top proposal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.