इंधन दरवाढीस कॉँग्रेसच जबाबदार : दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:59 AM2018-09-16T00:59:57+5:302018-09-16T01:00:04+5:30
देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉँग्रेसलाच जबाबदार ठरवले असून, त्यांनी इंधनाच्या किमती आंतरराष्टÑीय बाजाराशी संलग्न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी शनिवारी (दि.१५) केली.
नाशिक : देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉँग्रेसलाच जबाबदार ठरवले असून, त्यांनी इंधनाच्या किमती आंतरराष्टÑीय बाजाराशी संलग्न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी शनिवारी (दि.१५) केली.
खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आंतरराष्टÑीय बाजारपेठेत क्रुड आॅइलचे दर वाढले की भारतातही दर वाढतात, मात्र त्यासाठी कॉँग्रेस पक्षच जबाबदार असून त्यांच्या सत्तेच्या कालावधीत त्यांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केले आहेत. जीएसटीमध्ये इंधनाचा समावेश केल्यास त्याचे दर नियंत्रित होऊ शकतात. मात्र सर्वांचे एकमत झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
गेल्या चार वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाच्या मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पंतप्रधानांनी जगभर फिरून आणललेल्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३५ टक्के गुंतवणूक महाराष्टÑात झाली आहे, असे सांगून दानवे यांनी विरोधकांच्या हल्लाबोलचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.
राष्टÑवादी कॉंग्रेसने यापूर्वी चांदा ते बांदा यात्रा काढली होती. ज्या मार्गावरून ही यात्रा गेली त्या सर्वच मार्गांवरील नगरपालिकेत भाजपाला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आताही हल्लाबोल आंदोलनाचा परिणाम होणार नाही असे सांगून भारिप आणि एमआयएम युतीचा भाजपावर परिणाम होणार नाही. गेल्यावेळी लोकसभेच्या २३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा यंदा भाजपा महाराष्टÑात जिंकेल, असाही दावा त्यांनी केला आहे.