महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:37+5:302021-07-07T04:18:37+5:30
लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित लोकमत संवाद उपक्रमात डॉ. शेाभा बच्छाव, शरद आहेर तसेच प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, ...
लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित लोकमत संवाद उपक्रमात डॉ. शेाभा बच्छाव, शरद आहेर तसेच प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, मनपातील गटनेते शाहू खैरे आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वत्सला खैरे यांनी सहभाग घेतला. लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले आणि संवाद साधला.
महापालिकेच्या प्रथम निवडणुका १९९२ मध्ये झाल्या. यावेळी राज्यात आणि नाशिक महापालिकेत देखील काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने तो खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता. प्रथम महापौर (कै.) शांतारामबापू वावरे, (कै.) पंडितराव खैरे, प्रकाश मते, डॉ. शोभा बच्छाव यांच्यासारख्या मान्यवरांच्या हाती धुरा असल्याने त्यावेळी अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी झाली. थेट जलवाहिनी योजना, भुयारी गटार योजना, नाशिकरोड येथील उड्डाणपूल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव, तारांगण, फाळके स्मारक असे अनेक प्रकल्प त्यावेळी राबवण्यात आले. २००२ नंतर मात्र काँग्रेस पक्षाची सत्ता आली आणि एकही भरीव काम झाले नाही, असे सांगून या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत राबवण्यात आलेल्या नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत शहराचा दीर्घकालीन विचार करून जी कामे झाली होती, तशी कामे पुन्हा कधीच झाली नाहीत, आताही स्मार्ट सिटीच्या नावाखाली केवळ उधळपट्टी होत असून नागरी हितांची कामे होत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.
नाशिक शहरात आता काँग्रेस पक्षाचे बळ वाढवण्यावर भर देण्यात येत असून, त्यासाठी कठोर निर्णयांची गरज असल्याचे डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले. सत्तारूढ भाजपचे ६६ पैकी ४५ नगरसेवक हे भाजप-राष्ट्रवादीतून गेलेेेले असून त्यातील बहुतांश नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत, असे शरद आहेर यांनी सांगितले, तर काँग्रेस पक्षात महिलांना अत्यंत सन्मानाची वागणूक देण्यात येत असून त्यामुळेच महिला लोकप्रतिनिधी सक्षमतेने काम करीत असल्याचे वत्सला खैरे यांनी सांगितले.
इन्फो...
द्विसदस्यीय प्रभागच हवेत!
नाशिक महापालिकेच्या निवडुकीत एक किंवा द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीची चर्चा असली तरी काँग्रेस पक्षाला द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीच हवी असल्याचे मत यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत चर्चा झाली असून नागपूर अधिवेशनात निर्णय होऊ शकतो, असेही यावेळी सांगण्यात आले.
छायाचित्र क्रमांक ८८