कॉँग्रेसनिष्ठेची ऐशीतैशी, छाजेड यांचे पुत्र शिवसेनेत
By admin | Published: February 17, 2017 12:19 AM2017-02-17T00:19:25+5:302017-02-17T00:19:37+5:30
कॉँग्रेसनिष्ठेची ऐशीतैशी, छाजेड यांचे पुत्र शिवसेनेत
नाशिक : कॉँग्रेसचे निष्ठावान घराणे म्हणविणाऱ्या माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र तथा पक्षाचे माजी पदाधिकारी प्रितीश छाजेड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या वेळी हा प्रवेश सोहळा पार पडला.
जयप्रकाश छाजेड हे कॉँग्रेसचे निष्ठावान मानले जातात. त्यांचे वडील जितमल छाजेडही कॉँग्रेसचे निष्ठावान म्हणून परिचित होते. जयप्रकाश छाजेड यांनी नाशिक शहर कॉँग्रेसबरोबरच प्रदेश कॉँग्रेसवरही अनेक पदे भूषविली आहेत.
१९८५ मध्ये त्यांनी कॉँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविली त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांना अनेक वर्षे सत्तापदापासून वंचित राहावे लागले होते.
विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची जवळीक होती. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. सध्या ते इंटकचे प्रदेशाध्यक्षपद भूषवित आहेत. त्यांचे सुपुत्र अॅड. आकाश छाजेड यांनी एनएसयूआयच्या अध्यक्षपदापासून सुरुवात केल्यानंतर नगरसेवकपद य पक्षाचे शहराध्यक्ष पदही भूषविले, तर जयप्रकाश छाजेड यांच्या पत्नी शोभा छाजेड यांनी नगरसेवकपद आणि उपमहापौरपद भूषविले होते.
प्रितीश छाजेड यांच्याकडे तसे कॉँग्रेसचे कोणतेही थेट पद नव्हते किंबहुना ते कॉँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. तथापि, त्यांच्या अचानक शिवसेनेच्या व्यासपीठावर अवतीर्ण होण्याने साऱ्यांनाच आश्चर्य वाटले आणि अखेरीस उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधल्याने हीच का तुमची कॉँग्रेसनिष्ठा म्हणून पक्षातच चर्चा सुरू झाली आहे.