भूमी अधिग्रहण विधेयकास काँग्रेसचा विरोध निरर्थक
By admin | Published: May 15, 2015 11:50 PM2015-05-15T23:50:02+5:302015-05-15T23:54:27+5:30
केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत यांची टीका
नाशिक : भूमी अधिग्रहण विधेयकास विरोधकांकडून विशेषत: काँग्रेसकडून होत असलेला विरोध पूर्णपणे निरर्थक असून, केवळ उद्योगपतींचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केला.
नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. भगत पुढे म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयक हे पूर्णत: शेतकरी हिताचे आहे. ग्रामीण भागाचा विकास करताना त्याठिकाणी, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळण-वळण या सुविधा उपलब्ध करण्यासाठी भूमि अधिग्रहण करावेच लागेल. याचा अर्थ शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने या जमिनी घेतल्या जाणार नसून त्याकरिता मापदंड ठरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चारपटीने याचा मोबदला दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासून शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत.
देशातील शेतकरी जगला तरच विकास साध्य होईल, याकरिता शेतकऱ्यांचे हात बळकट करण्याचा सरकारचा पहिल्यापासून अजेंडा आहे. त्यादृष्टीनेच हे विधेयक तयार करण्यात आले असून, शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल; मात्र काँग्रेस या विधेयकावरून राजकारण करीत असून, उद्योगपतींना एकप्रकारे मदत करीत आहे. काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करीत असून, विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असेही भगत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)