चिमुकल्यांच्या मदतीने शंभरावर रोपट्यांचे संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 09:55 PM2020-05-27T21:55:26+5:302020-05-27T23:54:03+5:30
सिन्नर : दापूरच्या खांडवाडीतील एक तरुण भर उन्हाळ्यात बाल सवंगड्यांच्या मदतीने जवळपास सव्वाशे झाडांचे संवर्धन करीत आहे. अजय कडाळे असे त्याचे नाव असून लहानपणापासून त्याची वृक्षांशी मैत्री जडली आहे. त्यामुळे खांडवाडीतील त्याच्या घराचा परिसरही नंदनवन भासतो आहे.

अजय दापूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. खांडवाडीतील त्याच्या राहत्या घरापासून अर्धा किमीच्या आसपास वनविभागाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी आंबा, सुबाभूळ, वड, चाफा, बोर, जांभूळ, सीताफळ, कडुनिंब, करंजी, चिंच, बकाण अशा विविध प्रकारच्या वृक्षांची त्याने लागवड केली आहे. आणि या झाडांचे संवर्धन करण्यासाठी तो जीव ओतून काम करत आहे.
मुळात अजयची लहानपणापासून झाडांशी मैत्री आहे असे तो सांगतो. राहत्या घराच्या मागेपुढे त्याने फणस, नारळ, रामफळ, चाफा, केळी, पेरु अशी नानाविध फळझाडे लावलेली आहेत. घराच्या सभोवताली झाडे लावण्यासाठी जागा नसल्याने त्याने वनविभागाच्या जागेत स्वत: पुढाकार घेऊन सव्वाशे झाडे लावली.
वनविभागाने याबाबत विचारणा केली. तथापि, अजयचा हेतू स्वच्छ असल्याने वनविभागाने त्याला प्रोत्साहन दिले. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर तो दररोज वाडीतील बालसंवगडी अथवा घरातील चिलीपिली सोबत घेतो आणि सायकलला पाण्याने भरलेले ड्रम बांधून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पार पाडतो. सव्वाशे झाडांपैकी जवळपास ९० टक्के झाडे जगविण्यात त्याच्या ‘ग्रीन आर्मी’ला यश आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात झाडे अधिक बाळसे धरतील असा विश्वास अजयला आहे.