कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमध्येही दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 00:09 IST2021-11-28T00:07:53+5:302021-11-28T00:09:53+5:30
नाशिक: शहरासह जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात रोजच कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय सज्जता सुरू करण्यात आली आहे. रविवारी (दि. २८) यासंदर्भात मुख्यमंत्री विशेष बैठक घेणार असून, त्यात काय निर्णय होतो यावर प्रशासनाची दुसरी दिशा ठरणार आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमध्येही दक्षता
नाशिक: शहरासह जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात रोजच कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय सज्जता सुरू करण्यात आली आहे. रविवारी (दि. २८) यासंदर्भात मुख्यमंत्री विशेष बैठक घेणार असून, त्यात काय निर्णय होतो यावर प्रशासनाची दुसरी दिशा ठरणार आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आफ्रिकेत आढळल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र त्यानंतर बाजारपेठा, लग्न सोहळे, राजकीय कार्यक्रम यामुळे गर्दी वाढली असून त्यात आरोग्य नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले आहे. महापालिकेने मध्यंतरी शहरात आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरू केलेली कारवाई पुन्हा सुरू केली असून गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या कमी- अधिक होत आहे. त्यातच नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू झाल्याने महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे. शहरातील मंगल कार्यालये आणि लॉन्सवर लग्न सोहळ्यात गर्दी होत असल्याने आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने १८ पथके तैनात केली आहेत.
नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अगोदरच पूर्वतयारी करण्यात आली आहे. महापालिकेची दोन रुग्णालये आणि कोविड सेंटर्स येथे ऑक्सिजनची देखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय सज्जता झाली असली तरी शासन आता त्यावर काय निर्देश देते त्यावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे.
महापालिकेने वैद्यकीय तयारी पूर्णपणे केली असून ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक होईल अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. मात्र, नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळच येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
आठवडाभरात आढळलेले रुग्ण
२१ नोव्हेंबर- ५२
२२ नोव्हेंबर- ४५
२३ नोव्हेंबर- ६६
२४ नोव्हेंबर- ५१
२५ नोव्हेंबर- ५१
२६ नोव्हेंबर -३४
२७ नोव्हेंबर- ६५