दिलासा : किमान तपमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 07:37 PM2018-12-13T19:37:20+5:302018-12-13T19:39:24+5:30
नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला होता. यामुळे नाशिककर गारठले होते. थंडीच्या ...
नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला होता. यामुळे नाशिककर गारठले होते. थंडीच्या तीव्रतेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती; मात्र गुरुवारी (दि.१३) थंडीच्या कडाक्यापासून काही अंशी दिलासा मिळाला.
गुरुवारी पहाटे थंडीची तीव्रता जाणवली; मात्र दोन दिवसांच्या थंडीच्या तुलनेत काहीसा प्रभाव कमी होता. सकाळी ९ वाजेनंतर थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे दोन दिवसांपासून दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास पसंती देणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी काही तास आणि संध्याकाळी चाकरमान्यांनी घराकडे परतताना उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून आले. गुरुवारी कमाल तपमान २८.५ इतके नोंदविले गेले. किमान तपमानाचा पारा ११ अंशांपर्यंत वर सरकला. यामुळे थंडीची तीव्रता कमी झालेच्या अनुभव नागरिकांना आला.
या हंगामात सर्वाधिक नीचांकी किमान तपमान मंगळवारी (दि.११) ९.४ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. सलग दोन दिवस किमान तपमान इतके राहिल्याने नाशिककर गारठले होते. निफ ाड तालुक्याचा पारा थेट ८.८ अंशांपर्यंत खाली आला होता. बुधवारी किमान तपमानात किंचित बदल होऊन ९.६ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. त्यामुळे थंडीचा कडाका कायम होता. वाढत्या थंडीमुळे रस्त्यांवर पहाटे तसेच संध्याकाळनंतर शेकोट्या पेटू लागल्या होत्या. गोदाकाठालगत उघड्यावर राहणा-या आदिवासी मजुरांच्या वस्तींना शेकोट्यांचा एकमेव आधार होता. कारण नदीकाठ असल्यामुळे बोच-या थंडीचा कडाका या भागात अधिक जाणवत होता.
किमान तपमान दोन अंशांनी वाढले असले तरी किमान तपमानात खूप काही फरक गुरुवारी दिसून आला नाही. तसेच दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सकाळी वातावरणात आर्द्रताही वाढलेली होती. सकाळी ८९ टक्के, तर संध्याकाळी ३३ टक्के इतकी आर्द्रता मोजण्यात मागील आठवड्यात ८३ टक्के हा आर्द्रतेचा उच्चांक राहिला होता. एकूणच वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कायम असल्यामुळे त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. मागील तीन दिवस किमान तपमानाचा पारा घसरल्यामुळे बहुतांश नागरिकांना सर्दी-पडशाचा त्रासही जाणवायला सुरुवात झाली होती. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.