चाचण्या कायम ठेवूनही रुग्णसंख्येत सातत्याने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:10+5:302021-05-15T04:14:10+5:30
१ ते १३ मे यादरम्यान कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून, संशयितांच्या चाचण्यांची संख्या मात्र कायम आहे. नाशिक महापालिकेच्या ...
१ ते १३ मे यादरम्यान कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून, संशयितांच्या चाचण्यांची संख्या मात्र कायम आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने दररोज साधारणत: साडेआठ ते नऊ हजार तर जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात दररोज पाच ते साडेपाच हजार नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यामानाने मालेगाव महापालिकेत बोटावर मोजण्याइतपत दोन आकडी संख्येतच चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचण्यांमध्ये १ मे रोजी एकूण १३,८६८ लोकांच्या चाचणीमागे ३,४१२ बाधित रुग्ण सापडले होते. तेच प्रमाण ८ मे रोजी कायम होते. एकूण १३,५७८ लोकांच्या चाचणीत २,७९५ कोरोनाबाधित सापडले तर १३ मे रोजी करण्यात आलेल्या १४,३८४ नागरिकांच्या चाचणीत २,२७६ बाधित सापडले आहेत.
चौकट====
पॉझिटिव्हिटीही झाली कमी
१ मे रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २७ टक्के इतका होता. त्यात आरटीपीसीआरने करण्यात आलेल्या चाचणीचा १८.१७ तर रॅपिड अँटिजन चाचणीचा २५.४९ इतका होता. मात्र १३ मे रोजी करण्यात आलेल्या चाचणीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर घसरून १५.८२ वर येऊन स्थिरावला आहे. त्यातही नाशिक महापालिका हद्दीत कारोनाबाधितांचे प्रमाण ११ टक्के तर ग्रामीण भागात २५ टक्के इतके आहे.