नगरसूलला कोरोना रुग्णसंख्या घटल्याने नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:50+5:302021-04-17T04:13:50+5:30
नगरसूलमधील कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सूचना केल्यानंतर शासकीय यंत्रणा गतिमान झाली. जिल्हा परिषदेच्या ...
नगरसूलमधील कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सूचना केल्यानंतर शासकीय यंत्रणा गतिमान झाली. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात दोनदा बैठका घेतल्या. त्यात प्रथम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी नगरसूल गावात पाहणी केली. त्यात कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी गावातील जवळपास सर्वच हाॅटेल सील केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी गावात जनता कर्फ्यूसह रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार येवला प्रांत अधिकारी कासार, येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी उमेश देशमुख, सरपंच मंदाकिनी पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम यांनी वारंवार उपाययोजना करुन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
नगरसूल गावातील कोरोना साखळी तोडण्यासाठी देशमुख यांनी आशा सेविकांना सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली. गावात जंतुनाशक औषधांची फवारणी, आठवडे बाजार बंद, विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे काल परवाच्या रुग्णांच्या यादीत नगरसूलच्या एकाही रुग्णाचे नाव नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
कोट...
गावातील कोरोना रुग्णात घट झाली असली तरी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर वापर व हात वारंवार साबणाने धुवून प्रत्येकाने काळजी घ्यावी. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होईल.
- मंदाकिनी पाटील, सरपंच, नगरसूल
छाया भाऊलाल कुडके
===Photopath===
160421\16nsk_27_16042021_13.jpg
===Caption===
नगरसूलमध्ये पाहणी करताना प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी.