प्राणवायूचा पुरवठा सुरळीत झाल्याचा दिलासा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:15 AM2021-05-21T04:15:40+5:302021-05-21T04:15:40+5:30
नाशिक : एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्राणवायूच्या गळतीमुळे गंभीर रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या जीवितहानीने आकांत उसळला होता. त्या घटनेनंतर ...
नाशिक : एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्राणवायूच्या गळतीमुळे गंभीर रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या जीवितहानीने आकांत उसळला होता. त्या घटनेनंतर जवळपास तीन आठवडे शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता, मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने खासगी आणि शासकीय कोविड हॉस्पिटल्सना बराचसा दिलासा मिळू लागला आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना मे महिन्याच्या प्रारंभापर्यंत लागत असलेली १२५ मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजनची गरजदेखील आता निम्म्याहून कमी झाली आहे. त्यामुळेच दररोज प्रत्यक्ष होणारा १०० मेट्रिक टनहून अधिकचा पुरवठा शहरासह जिल्ह्यासाठी पुरेसा ठरु लागला आहे. एप्रिल महिन्यात दररोज कोणत्या ना कोणत्या खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याच्या घटना घडत होत्या. काही रुग्णालयांनी तर ऑक्सिजनच्या सातत्यपूर्ण पुरवठ्याचा अभाव असल्याने नवीन रुग्ण दाखल करून घेण्यासच नकार देण्यास सुरुवात केली होती. तर, गत आठवड्यात काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. काही रुग्णालयांनी तर ऑक्सिजन केवळ काही तासांपुरताच शिल्लक असल्याने दाखल रुग्णांना अन्यत्र हलविण्याची विनंती रुग्णांच्या नातेवाइकांना केली. त्यामुळे रुग्णालयांच्या प्रशासनाचे आणि संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये अनेक वाददेखील झाले. मात्र, जे दाखल आहेत, त्यांनाच कसाबसा ऑक्सिजन पुरवण्याची स्थिती मे महिन्याच्या प्रारंभापर्यंत कायम होती. त्या तुलनेत गत दोन आठवड्यांपासून सुमारे १०० टनहून अधिक ऑक्सिजन नाशिकपर्यंत पोहोचत असल्याने ऑक्सिजनची तूट काही प्रमाणात तरी कमी होऊ लागल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.
इन्फो
ऑक्सिजनचा साठा आरक्षित
रेल्वेने नाशिक जिल्ह्याला २४ टन ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यानंतर थोड्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊ लागला. दरम्यान, गत दोन आठवड्यांपासून प्रशासनाने १६ टन ऑक्सिजनचा साठा कायमस्वरूपी आरक्षित ठेवण्यास प्रारंभ केला असून, तो काही दिवसांत ३० टनांपर्यंत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे यदाकदाचित दुर्घटना घडली किंवा पुरवठ्यात खंड पडला किंवा कोणत्याही एखाद्या युनिटला अचानकपणे ऑक्सिजन कमी पडला तर हा आरक्षित ऑक्सिजन किमान काहीकाळ उपयोगात येऊ शकणार आहे.